मारहाणीचा हक्क ‘त्यांना’ कोणी दिला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 12:18 AM2019-01-13T00:18:34+5:302019-01-13T00:18:41+5:30
नीता बनसोडे : मानपाडा पोलिसांत चार-पाच महिलांविरोधात गुन्हा
कल्याण : माझ्या पतीला मारहाण करण्याचा हक्क शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांना कोणी दिला? त्याची चूक असेल, तर त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवे होते. परंतु, त्यांनी पतीला मारत त्याची धिंड काढून घरी आणले. याप्रकरणी त्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार देण्यासाठी मानपाडा पोलिसात गेले असता तक्रार घेतली नाही, अशी बाजू तुषार बनसोडे याची पत्नी नीता यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत मांडली.
डोंबिवली पूर्वेतील नांदिवली टेकडी येथे तुषार बनसोडे याचे इलेक्ट्रॉनिक दुकान आहे. सविता मोरे हिची तुषारने छेड काढल्याचा आरोप करत शिवसेनेच्या काही महिला कार्यकर्त्यांनी त्याला ७ जानेवारीला रस्त्यात मारहाण केली. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी तुषारला अटक केली.
नीता म्हणाल्या की, ‘माझ्या पतीविरोधातील सर्व आरोप खोटे आहेत. मोरे यांनी पोलिसात तक्र ार करायली हवी होती. मात्र, तसे न करता मोरे यांनी शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांना सोबत घेऊन माझ्या पतीला भररस्त्यात मारहाण केली. तसेच त्याची धिंड काढत घरी आणले. त्यावेळी मी त्या कार्यकर्त्यांकडे माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी माझे ऐकले नाही. शिवाय, मानपाडा पोलिसांनी माझी तक्रारही घेतली नाही. त्यामुळे न्याय मिळावा, यासाठी मी कल्याण परिमंडळ-३ चे पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्याकडे तक्र ार अर्ज दिला आहे. शिवाय, त्याची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री रणजित पाटील आणि ठाणे पोलीस विवेक फणसळकर यांना पाठवली आहे.’
यासंदर्भात मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले म्हणाले, ‘नीता यांची तक्रार घेतली गेली नसेल, तर त्यांनी माझ्याकडे तक्र ार करायला हवी होती. त्या पोलीस ठाण्यात आल्यास त्यांची तक्र ार नोंदवून चौकशी करून कारवाई केली जाईल.’ दरम्यान, पोलिसांनी चार ते पाच चार-पाच महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.