...कोणी अधिकारी देता का अधिकारी?
By Admin | Published: February 21, 2017 05:27 AM2017-02-21T05:27:52+5:302017-02-21T05:27:52+5:30
शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर अस्तित्वात आलेल्या शिक्षण विभागाकडे राज्य सरकारचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. येथील
कल्याण : शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर अस्तित्वात आलेल्या शिक्षण विभागाकडे राज्य सरकारचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. येथील वर्ग-१ चे प्रशासन अधिकारी आणि वर्ग-२ चे शिक्षण अधिकारी ही पदे रिक्त असल्याने येथील केडीएमसीच्या शिक्षण विभागाच्या कारभाराचे तीनतेरा वाजल्याचे चित्र आहे. विद्यार्थ्यांची उशिराने निघणारी सहल याचे ताजे उदाहरण असून अन्य प्रस्तावांनाही बसलेली खीळ पाहता कोणी अधिकारी देता का हो अधिकारी, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर शिक्षण विभाग पूर्णपणे केडीएमसीच्या अखत्यारीत आलेला आहे. महापालिकेत नगरसेवक असलेल्यांची शिक्षण समितीवर सदस्य म्हणून नेमणूक केली आहे. ही समिती स्थापन होऊन आता वर्षाचा कालावधी लोटायला आला असताना वर्षभरात केवळ दोनच सभा झाल्या आहेत. दुसरीकडे सरकारकडे भरण्यात येणारे प्रशासन अधिकारी आणि शिक्षण अधिकारी पद रिक्त आहे. सरकारकडून प्रशासन अधिकारी म्हणून प्रतिनियुक्तीवर पाठवलेले सुरेश आवारी यांची ८ जून २०१६ ला बदली झाली. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. आवारी यांच्यानंतर केडीएमसीचे सहायक आयुक्त प्रकाश ढोले यांच्याकडे या पदाचा प्रभारी पदभार सोपवला होता. परंतु, त्यांची प्रभाग अधिकारीपदी नेमणूक झाल्याने ते प्रभारी म्हणून एक महिनाच या पदावर राहिले. यानंतर, वर्ग-३ चे पद असलेले शिक्षण विस्तार अधिकारी जे.जे. तडवी यांना या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. मात्र, प्रशासन अधिकारी या पदावर पूर्णवेळ अधिकारी नसल्याने शिक्षण विभागाच्या कारभाराचा बोजवारा उडाला आहे. याची प्रचीती नुकत्याच झालेल्या शिक्षण समितीच्या सभेत आली. दुसरीकडे वर्ग-२ चे शिक्षण अधिकारीपदही दोन वर्षे रिक्त आहे. सध्या भोंगळ कारभार पाहता सक्षम अधिकाऱ्यांची शिक्षण विभागाला आवश्यकता आहे. मात्र, याकडे होत असलेले सरकारचे दुर्लक्ष चर्चेचा विषय ठरला आहे. (प्रतिनिधी)