वीज वितरणाचे खासगीकरण कुणाच्या हिताचे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 11:23 PM2018-11-25T23:23:28+5:302018-11-25T23:24:28+5:30
मुंब्रा, कळव्यातील रहिवाशांचा सवाल : वीज वितरणाच्या खासगीकरणास ग्राहकांचा विरोध
जितेंद्र कालेकर
ठाणे : कळवा, मुंब्रा परिसरातील वीजगळती आणि वीजचोरी रोखण्यासाठी तसेच वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी भिवंडीच्या धर्तीवर खासगीकरणातून वीजपुरवठा करण्याची राज्य सरकारची योजना असली, तरी या भागातील बहुतांश नागरिकांनी या खासगीकरणाला विरोध दर्शवला आहे. शिवसेना उपनेते दशरथ पाटील यांनी तर खासगीकरण झाल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
मुंब्रा आणि कौसा भागातील विजेची थकबाकी, गळती तसेच चोरी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या परिसरात आता विजेचे वितरण खासगी कंपनीमार्फत करण्याची घोषणा महावितरण कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी ठाण्यात केली. सदोष मीटर बदलण्याबरोबर ते पुरवणाऱ्या कंपनीला काळ्या यादीत टाकणे तसेच येत्या तीन महिन्यांत खासगीकरण करून वीजगळतीवर मार्ग काढण्यासाठी कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत. यावर कळवा, मुंब्रा भागांतील स्थानिक रहिवासी आणि शिवसेनेचे उपनेते दशरथ पाटील म्हणाले, झोपडपट्टी परिसरात वीजचोरीचे प्रकार अधिक आहेत. या भागातील लोकांच्या चुकीमुळे संपूर्ण कळवा, मुंब्रावासीयांवर खासगीकरणाचा भुर्दंड कशाला? खासगी वीज आणि मीटरचे दर अधिक आहेत. त्यामुळेच खासगीकरणाला विरोध आहे. हा निर्णय मागे घेतला नाही, तर आठ ते दहा दिवसांतच जनआंदोलन उभारले जाईल, असेही ते म्हणाले. यासाठी सर्वपक्षीय बैठकीचेही त्यांनी आवाहन केले आहे. यात ज्या पक्षाकडून प्रतिसाद दिला जाणार नाही, त्यांना निवडणुकीत परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. खासगीकरण कोणासाठी, याचे दलाल कोण, असे सवाल त्यांनी केले. खासगीकरणातून येथील ग्राहकांवर अन्याय होणार आहे. ज्या परिसरातून वीजगळती किंवा चोरी होत असेल, तेवढ्याच भागापुरते खासगीकरण करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
खारीगाव, पारसिकनगर येथील प्रा. श्रीरंग कुडूक म्हणाले, खासगीकरणाची आताच का गरज वाटली? जे वीजबिलाचा भरणा करत नसतील, त्यांच्यावर कारवाई केली जावी. वीजचोरी रोखली पाहिजे. पण, खासगीकरण हा त्यासाठी पर्याय नाही. सरकारचाही महसूल वाढला पाहिजे, असेही प्रा. कुडूक म्हणाले.
कळव्याच्या जय सेवालाल कामगार सेवा संघटनेचे अध्यक्ष रूपसिंग राठोड म्हणाले, खासगीकरणामुळे ग्राहकांना त्रास होणार आहे. सध्या झोपडपट्टी भागातच १२०० ते १५०० रुपयांपर्यंत बिल येते. खासगीकरणामुळे बिलाच्या रकमेतही वाढ होणार आहे. सध्या काही घरे १५०० रुपये भाड्याने आहेत. त्यापेक्षा अधिक वीजबिल आल्यास कामगार वस्तीतील रहिवाशांना ते परवडणारे नाही.
खासगीकरणातून ग्राहकांना फायदा होणार नाही. वितरकाची मनमानी वाढून सरकारचे त्यावर नियंत्रण राहणार नाही. त्यामुळेच लोकहितासाठी खासगीकरणाला ठाम विरोध असल्याचे राष्टÑवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष मंदार केणी म्हणाले. मुंब्रा येथील रहिवासी आणि राकाँचे पदाधिकारी रफीक शेख म्हणाले, खासगीकरणात अनेक त्रुटी आहेत. खासगी वीज खूप महाग आहे. राष्ट्रवादीचा याला विरोध आहे.
खासगीकरण असावेच
याउलट, खासगीकरण केलेच पाहिजे, असे परखड मत कळवा, खारेगाव येथील प्रवीण भालेकर यांनी व्यक्त केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यातून वीजचोरी थांबणार आहे. दिवा, कळवा, मुंब्रा आणि शीळ या भागातील वाढत्या वीजमागणीलाही त्या माध्यमातून पर्याय उपलब्ध होईल. त्याचा फायदा ग्राहकांनाच होणार आहे. प्रामाणिक ग्राहकांना याचा कोणताही फटका बसणार नसल्याचा दावाही भालेकर यांनी केला आहे.