भिवंडीतील जीवघेण्या रस्त्याला वरदहस्त कुणाचा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 12:29 AM2020-03-09T00:29:43+5:302020-03-09T00:29:56+5:30

या मार्गावर असलेल्या मराठा पंजाब हॉटेलसमोरील अंजूर चौकात तर रस्त्याची अक्षरश: चाळन झाली असून भलेमोठे खड्डे या चौकात पडले आहेत.

Who has the most dangerous road in Bhiwandi? | भिवंडीतील जीवघेण्या रस्त्याला वरदहस्त कुणाचा ?

भिवंडीतील जीवघेण्या रस्त्याला वरदहस्त कुणाचा ?

Next

नितीन पंडित, भिवंडी

एखाद्या शहराचा विकास हा त्या शहराला जोडणाऱ्या महामार्गांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतो. मात्र, या रस्त्यांची दुरवस्था होऊन जेव्हा नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो, त्यावेळी असे जीवघेणे रस्ते काय कामाचे? असा सवाल नागरिक नेहमीच विचारतात. भिवंडीत अशाच प्रकारचा जीवघेणा रस्ता सध्या निर्माण झाला असून या जीवघेण्या रस्त्याला नेमका वरदहस्त कुणाचा, असा सवाल येथील नागरिकांना पडला आहे. हा जीवघेणा रस्ता म्हणजे भिवंडी-वसई महामार्ग म्हणून ओळखला जाणारा चिंचोटी-अंजूरफाटा-माणकोली रस्ता. सध्या या रस्त्याची परिस्थिती एवढी दयनीय झाली आहे की, या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिक आपला जीव मुठीत धरूनच प्रवास करतात. विशेष म्हणजे हा रस्ता बीओटी तत्त्वावर देण्यात आला असून सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर या खासगी कंपनीकडून दिवसरात्र या रस्त्यावरून टोलवसुली होते. एकीकडे टोलवसुलीची सक्ती तर दुसरीकडे रस्त्याची दुरवस्था अशा दुहेरी कोंडीत येथील प्रवासी व वाहनचालक अडकले आहेत.

यावर नियंत्रण असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे या रस्त्याच्या दुरु स्तीकडे पुरते दुर्लक्ष झाले आहे. या रस्त्याची दुरुस्ती व सुधारण्यासाठी स्थानिक नागरिकांनी एकत्र येत संघर्ष समिती स्थापन करून अनेकवेळा रास्ता रोको आंदोलने केली. मात्र, आंदोलनाच्या प्रत्येकवेळी सुप्रीम कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी रस्ता दुरुस्तीची आश्वासने देऊनही आजपर्यंत तो दुरुस्त झालेला नाही. सध्या या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून रस्त्यावर होणाºया अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हा रस्ता २४ किलोमीटर लांबीचा असून २८ आॅगस्ट २००९ पासून रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात केली. हे काम पूर्ण करण्यासाठी सरकारने कंपनीला दोन वर्षे सहा महिन्यांचा कालावधी दिला होता. परंतु, ही अडीच वर्षांची मुदत पूर्ण होऊनही कंपनीने रस्त्याची आवश्यक असलेली बरीचशी कामे आजपर्यंत अपूर्ण ठेवलेली आहेत. विशेष म्हणजे कामे अपूर्ण असूनही या कंपनीने १९ जानेवारी २०१२ पासून मोठ्या प्रमाणात टोल वसूल करण्यास सुरुवात केली आहे. सध्या सुप्रीम कंपनीकडून ही टोलवसुली केली जात आहे. टोलवसुली करता मग सुविधा का देत नाही, असा सवाल विचारला जात आहे.

या मार्गावर असलेल्या मराठा पंजाब हॉटेलसमोरील अंजूर चौकात तर रस्त्याची अक्षरश: चाळन झाली असून भलेमोठे खड्डे या चौकात पडले आहेत. विशेष म्हणजे मानकोलीवरून ठाण्याच्या तसेच वसईच्या दिशेने येजा करणाºया वाहनांची गर्दी या चौकात जास्त असते. मात्र, तरीही या चौकात पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यांकडे सुप्रीम कंपनीसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांचे लक्ष लागत नाही, हेच येथील नागरिकांचे खरे दुर्दैव आहे. या ठिकाणी नेहमीच प्रचंड वाहतूककोंडी होत असते. ही वाहतूककोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांची मोठ्या प्रमाणात दमछाक होत असते. सध्या अंजूरफाटानाका ते रेल्वेब्रिज असे रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे.

मात्र, या कामामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. त्याचबरोबर अंजूरफाटा ते खारबाव अशा सुमारे चार किलोमीटरपर्यंतच्या रस्त्याची चाळण झाली असल्याने प्रवाशांसह स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या अंजूरफाटानाक्यावर रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून नागरिकांसह प्रवाशांच्या या गंभीर बाबीकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिक वेळोवेळी करत आहेत. मात्र, नागरिकांच्या या मागणीकडे पुरते दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या जीवघेण्या रस्त्यावर तो नादुरु स्त असूनही टोल वसूल करणाºया कंपनीला नेमका वरदहस्त कुणाचा, असा सवाल नागरिक करीत आहेत.

Web Title: Who has the most dangerous road in Bhiwandi?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.