केडीएमसीतील शिक्षण समितीवर कोणाला संधी? आज महासभा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 12:33 AM2019-05-09T00:33:09+5:302019-05-09T00:33:25+5:30
केडीएमसीतील शिक्षण समिती सदस्यांचा एक वर्षाचा कालावधी संपल्याने गुरुवारी विशेष महासभेत नवीन सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
कल्याण : केडीएमसीतील शिक्षण समिती सदस्यांचा एक वर्षाचा कालावधी संपल्याने गुरुवारी विशेष महासभेत नवीन सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. समितीचे सभापतीपद शिवसेनेच्या वाट्याला जाणार आहे. त्यामुळे त्याआधी या समितीवर वर्णी लावून घेण्यात सेनेतील कोणते नगरसेवक यशस्वी ठरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
१९ मार्च २०१८ ला शिक्षण समितीचे नवीन सदस्य नियुक्त करण्यात आले होते. तर १३ एप्रिलला सभापतीपदाची निवडणूक झाली होती. परंतु, यंदा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सदस्यांची नियुक्ती आणि सभापतीपदाची निवड या प्रक्रिया पूर्णत: रखडल्या होत्या. राज्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या अहवालानुसार आता गुरुवारी शिक्षण समिती सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी दुपारी २ वाजता केडीएमसीने विशेष महासभा बोलावली आहे.
शिक्षण समितीमध्ये ११ सदस्य असून पक्षीय बलाबलानुसार शिवसेना ५, भाजप ४, मनसे आणि काँग्रेस प्रत्येकी १ अशी स्थिती आहे. मागील वर्षी शिक्षण समितीचे सभापतीपद भाजपच्या वाट्याला गेले होते. आता शिवसेनेची टर्म असल्याने समितीवर वर्णी लावून घेण्यात आणि सभापतीपद पटकाविण्यात कोण यशस्वी होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अगोदर शिक्षण मंडळावर सदस्य नेमताना नगरसेवकांव्यतिरिक्त बाहेरील व्यक्तींना प्राधान्य दिले जात असत. परंतु, आता तौलनिक संख्याबळाच्या आधारे प्रमाणशीर प्रतिनिधीत्वाच्या माध्यमातून महापालिकेतील नगरसेवकांचीच या ११ सदस्यांच्या समितीवर वर्णी लावली जात आहे.
शिक्षण मंडळाला पाच वर्षांचा कालावधी मिळत असत. परंतु, शिक्षण समितीला एक वर्षाचाच कालावधी ठरविण्यात आला आहे.