उल्हासनगर महापालिकेच्या रजिस्टरवरून शिलाई मशीन व घरघंटी वाटप करत कोण?
By सदानंद नाईक | Published: September 25, 2024 08:15 PM2024-09-25T20:15:01+5:302024-09-25T20:15:10+5:30
महापालिकेचे कानावर हात, आयुक्तांकडे तक्रार
सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिकेचे कोणतेही आदेश नसतांना मंगळवारी टॉउन हॉलमध्ये महापालिका रजिस्टरवरून महिलांना शिलाई मशीन व घरघंटी वाटप करण्याचा प्रकार उघड झाला. याबाबत कायद्याने वागा संघटने आयुक्त विकास ढाकणे यांना लेखी पत्र देऊन चौकशीची मागणी केली.
उल्हासनगर महापालिका महिला व बालकल्याण विभागा तर्फे खनिज क्षेत्र कल्याण निधीतून एकून ३ हजार २०० महिलांना लोकसभा निवडणूकपूर्वी शिलाई मशीन व घरघंटी देण्याचा निर्णय घेतला. महिलांकडून अर्ज मागवून पात्रता यादी प्रसिद्ध केली. त्यानंतर प्रांत कार्यालय पटांगणात प्रायोगिकतत्वावर शिलाई मशीन व घरघंटी वाटप कार्यक्रम संपन्न झाला. मात्र कार्यक्रमाच्या दुसऱ्याच दिवशी निवडणूक आचारसंहिता लागल्याने वाटप कार्यक्रम रखडला. दरम्यान महापालिका शाळेतून शिलाई मशीन व घरघंटी वाटप करण्याचा प्रकार उघड झाल्यावर, वाटणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. लोकसभा निवडणूक होऊन मुख्यमंत्री लाडक्या बहिनेचे पैसे महिलांना सुरू झाले. तर दुसरीकडे शिलाई मशीन व घरघंटी वाटप प्रक्रिया रखडली आहे.
महापालिकेने पात्रताधारक महिलांना त्यांच्या मनाजोगे शिलाई मशीन व घरघंटी खरेदी करता यावी म्हणून, महिलांना ईझीं पे कार्ड देण्याची प्रक्रिया पुढील आठवड्यात महिला व बालकल्याण विभाग सुरू करणार असल्याची माहिती विभागाचे प्रमुख नितेश रंगारी यांनी दिली. दरम्यान मंगळवारी महापालिका टॉउन हॉल मध्ये एका गाळयात साठा करून ठेवलेल्या शिलाई मशीन व घरघंटीचे वाटप काही जण करीत होते. त्यांच्याकडे महापालिकेचे रजिस्टर मिळून आले असून शिलाई मशीन व घरघंटी मशीन दिल्यावर त्यामध्ये महिलांची सही घेतली जात होती. हा प्रकार कायद्याने वागा संघटनेचे राज असरोडकर यांना मिळाल्यावर त्यांनी याबाबत विचारणा केली. मात्र त्यांना कोणतेही उत्तर देता आले नाही. असरोडकर यांनी याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी आयुक्त विकास ढाकणे यांना केली. याप्रकाराने शिलाई मशीन व घरघंटी यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचे बोलले जाते.
महापालिकेचे कानावर हात?
महापालिका महिला व बालकल्याण विभागाचे प्रमुख नितेश रंगारी यांनी मात्र महापालिकेकडून शिलाई मशीन व घरघंटी वाटप करण्याचा कोणताही कार्यक्रम नसल्याचे स्पष्ट केले. पात्रता महिलांना ईझीं कार्ड देऊन ते त्याकार्डावर शिलाई मशीन व घरघंटी खरेदी करून बिल महापालिकेला जमा करावी लागणार आहे.