व्हिडीओ व्हायरल केले कुणी? पोलिस, गुन्हे शाखेचे कानावर हात
By सदानंद नाईक | Published: February 8, 2024 10:12 AM2024-02-08T10:12:24+5:302024-02-08T10:12:42+5:30
फुटेज दुसऱ्या दिवशी व्हायरल झाले.
सदानंद नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : हिललाइन पोलिस ठाण्यातील गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्याबाबत हिललाइन पोलिस व गुन्हे अन्वेषण विभागाने कानावर हात ठेवले. आम्ही हे फुटेज व्हायरल केले नसल्याचे दोन्ही विभागांनी लोकमतला सांगितले. त्यामुळे व्हिडीओ व्हायरल केले कुणी, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
उल्हासनगरच्या हिललाइन पोलिस ठाण्यातील आमदार गणपत गायकवाड यांच्या अंदाधुंद गोळीबाराचे पहिले सीसीटीव्ही फुटेज दुसऱ्या दिवशी व्हायरल झाले.
आमदारांचा मुलगा वैभव गायकवाड याला वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनबाहेर झालेल्या धक्काबुक्कीचे सीसीटीव्ही फुटेज त्यानंतर व्हायरल झाले. त्यानंतर मंगळवारी गोळीबाराचे ११ मिनिटांचे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले. पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्थानिक पोलिस ठाण्याचे नियंत्रण असते. अशा वेळी या महत्त्वाच्या तपासातील सीसीटीव्ही फुटेज एकापाठोपाठ एक सोशल मीडियावर व्हायरल कोण करते, असा प्रश्न उपस्थित होऊन पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
फुटेज तपास अधिकाऱ्याकडे
हिललाइन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल जगताप यांना विचारले असता, त्यांनी गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज तपास अधिकाऱ्याकडे असल्याचे सांगितले. आम्ही फुटेज व्हायरल केलेले नाही, असे जगताप म्हणाले. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त व या प्रकरणातील प्रमुख तपास अधिकारी शिवाजी पाटील यांनीही गोळीबाराच्या व्हायरल सीसीटीव्ही फुटेजबाबत कानावर हात ठेवले.
गायकवाड कुटुंबाला
न बोलण्याचे आदेश?
गोळीबारानंतर वैभव गायकवाड फरार आहे. भाऊ अभिमन्यू यांचा मोबाइल बंद आहे. आमदारांचे पीए राऊत हेही बोलू इच्छित नाही. पक्षाच्या नेत्यांनी १४ फेब्रुवारीपर्यंत मीडियाला कोणतीही प्रतिक्रिया देण्यास मनाई केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
गिरगावातील चौकाला मराठा समाजाचे दिवंगत नेते ॲडव्होकेट शशिकांत उर्फ आप्पासाहेब पवार यांचे नाव देण्याचा सोहळा ‘लोकमत समूहा’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांच्या हस्ते झाला. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार, काँग्रेसचे आमदार भाई जगताप, वीरेंद्र पवार व इतर मान्यवर उपस्थित होते. (छाया : दत्ता खेडेकर )