ठाणे महापालिका निवडणुकीत संधी कोण साधणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 11:44 PM2019-10-27T23:44:24+5:302019-10-27T23:45:08+5:30
दुसरीकडे २०१२ च्या निवडणुकीत मनसे प्रथमच ठाणे महापालिकेची निवडणूक लढली होती. त्यावेळी त्यांनी सत्ता स्थापनेत महत्वाची भूमिका बजावली होती.
अजित मांडके, ठाणे
लोकसभेनंतर अवघ्या काही महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला कौल मिळाला असला तरी राज्यात त्यांच्या जागा कमी झाल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातही किंबहुना ठाण्यात शिवसेना, भाजपच्या अपेक्षेप्रमाणे जागा आल्या असल्या तरी शिवसेनेला याचा अधिकच फटका बसला आहे. लोकसभेला जे चित्र होते, ते विधानसभेला दिसून आलेले नाही. किंबहुना ठाण्यात शिवसेनेच्या मतांमध्ये वाढ झाली असली तरी भाजपच्या मतांच्या टक्केवारीत घट झाली आहे. दुसरीकडे शून्य असलेल्या मनसेला विधानसभेत उभारी मिळाल्याने त्यांना आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी आता आणखी एक संधी प्राप्त झाली आहे. ठाण्यात राष्ट्रवादी काही अंशी असल्याने मनसेच्या मदतीने तिला वाढण्याची संधी या निवडणुकीने दिली आहे.
कॉंग्रेसला मात्र या संधीचा कोणत्याही प्रकारे फायदा उठवताच आलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भविष्यातील ठाणे महापालिका निवडणुकांचे समीकरणे ठरत असतांना शिवसेनेला पुन्हा एकहाती सत्ता संपादीत करणे कठीण जाणार असून त्यांच्या मतांमध्ये फटका बसण्याची भीती आहे. २०१२ मध्ये ज्या पध्दतीने मनसेने ठाणे महापालिकेत निर्णायक भूमिका बजावली होती, तशीच संधी मनसेला महापालिका निवडणुकीत चालून येऊ शकते.
ठाण्यात भाजपच्या मतांमध्ये २० हजारांची वाढ झाली असली तरी मनसेने राष्ट्रवादीच्या मदतीने भाजपला चांगलीच टक्कर दिली आहे. मनसेला तब्बल ७२ हजार मतांचा जोगवा मिळाला आहे. भाजपच्या मतांमध्ये वाढ झाली असली तरी मतांच्या टक्केवारीत घट झाल्याचे उघड झाले आहे. त्याचा परिणाम आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत स्पष्ट दिसणार आहे. त्यात आता विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेची बाजू भक्कम करण्यासाठी पक्षाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. ठाण्याला काही मंत्रीपदे मिळण्याची शक्यता असून एकनाथ शिंदे यांना कोणते पद मिळते हे पाहणेही महत्वाचे मानले जात आहे. ठाण्यात भाजपकडे देखील मंत्रीपद येण्याची शक्यता आहे. ही पदे मिळाली तर त्याचा फायदा घेऊन ठाण्यातील प्रकल्पांना चालना देणे महत्वाचे ठरणार आहे. शिंदे यांना पुन्हा पालकमंत्रीपद मिळेल, असे बोलले जात असले तरी जिल्ह्यात शिवसेनेची ताकद कमी झाल्याने ते भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे शिंदे यांना अधिक मोठे पद मिळण्याची शक्यता आहे. याचा फायदा आगामी काळात शिवसेनेला उचलण्याची संधी आहे.
त्या संधीचे शिवसेना सोने करते की माती हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाणे शहर मतदारसंघातून शिवसेनेच्या अनेक बुथमधून भाजपला कमी मतदान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही धोक्याची घंटा मानली जात आहे.
राष्ट्रवादी आणि मनसेने येत्या महापालिका निवडणुकीकरिता कंबर कसली आहे. नव्या वर्षात ठाणे महापालिकेत मोठे फेरबदल पहावयास मिळणार आहेत. यामध्ये महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते आदींसह इतर महत्वाचे बदल होणार आहेत. परंतु आता ज्या पध्दतीने निवडणुकीचे निकाल लागले आहेत. त्यामुळे या पदांवर शिवसेनेकडून चांगली नावे किंवा पक्षाच्या दृष्टीने लाभदायक ठरतील अशाच नावांना भाव असणार आहे. ही पदे कोणाच्या पारड्यात पडणार हेही पाहणे महत्वाचे ठरणार असून त्यावर पुढील समीकरणे ही शिवसेनेला फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे २०१२ च्या निवडणुकीत मनसे प्रथमच ठाणे महापालिकेची निवडणूक लढली होती. त्यावेळी त्यांनी सत्ता स्थापनेत महत्वाची भूमिका बजावली होती. शिवसेनेची सत्तेची समीकरणे विस्कटली होती, त्यावेळेस मनसेने शेवटच्या क्षणी शिवसेनेला टाळी दिली आणि शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता. आता ठाण्यात मनसेचे काहीही नसतांना त्यांना ठाण्यात ७२ हजार, कोपरी पाचपाखाडीमध्ये २१ हजार आणि ओवळा माजिवड्यात २१ हजार मते मिळाली आहेत. या तिघांची बेरीज केली तर मनसेला एक लाखाहून अधिक मते मिळाली आहेत. साहजिकच ठाण्यात इंजिनाला धावण्यासाठी वातावरण पोषक झाले आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत लाभलेल्या यशाचे सोने मनसे कसे करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर राष्ट्रवादीला ठाण्यात आपण कुठे आहोत, हे समजले आहे. राष्ट्रवादीचे ठाण्यात ३५ नगरसेवक असले तरी शहराच्या मध्यवर्ती भागात त्यांचे संख्याबळ आठचेच आहे. त्यातील चार नगरसेवक येत्या काळात पक्ष बदलण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे ही संख्या चारवर येऊ शकते.