गुंजाळ हत्येतील सूत्रधार कोण?

By admin | Published: December 29, 2015 12:58 AM2015-12-29T00:58:48+5:302015-12-29T00:58:48+5:30

शिवसेनेचे नगरसेवक रमेश गुंजाळ यांच्या हत्याप्र्रकरणातील चारही आरोपी पोलीस कोठडीत असले तरी या हत्येमागील सूत्रधार कोण, हे शोधण्याचे आव्हान टिटवाळा पोलिसांना पेलावे लागणार आहे.

Who is the mastermind of the murder of Gunjal? | गुंजाळ हत्येतील सूत्रधार कोण?

गुंजाळ हत्येतील सूत्रधार कोण?

Next

- पंकज पाटील,  अंबरनाथ
शिवसेनेचे नगरसेवक रमेश गुंजाळ यांच्या हत्याप्र्रकरणातील चारही आरोपी पोलीस कोठडीत असले तरी या हत्येमागील सूत्रधार कोण, हे शोधण्याचे आव्हान टिटवाळा पोलिसांना पेलावे लागणार आहे.
अटकेतील चार आरोपींपैकी संदीप गायकर याच्या दोन काकांना गुंजाळ यांनी मारले होते, याचा राग मनात असल्याने आणि काही दिवसांत आम्हालाही गुंजाळ मारणार होते. त्यामुळेच आम्हीच त्यांचा काटा काढला, असा जबाब आरोपींनी टिटवाळा पोलिसांना दिला आहे. मात्र, गुंजाळ यांच्या पत्नीसह त्यांच्या सर्व नातेवाइकांनी सोमवारी पोलीस ठाण्यात जाऊन मारेकऱ्यांसोबत सूत्रधारांनाही अटक करण्याची मागणी केली. त्यामुळे या हत्येमागे आणखी कोणी सूत्रधार असल्याचा संशय नातलगांना वाटतो. या आरोपींव्यतिरिक्त संशयाच्या पिंजऱ्यात असलेल्या अन्य व्यक्तींकडून नेमकी कोणती माहिती मिळते, यावरच पुढील तपास आणि हत्येमागचे धागेदोरे अवलंबून आहेत, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
आम्ही नाशिकला वकिलांना भेटायला गेलो होतो, येताना ढाब्यावर जेवायला थांबलो, अशी माहिती चौघांनीही टिटवाळा पोलिसांना दिल्याचे सांगितले जाते. मात्र, कोणत्या वकिलांना ते भेटले किंवा नेमकी त्यांची जेवणाची आणि पोलिसांच्या गस्तीची वेळ कशी जुळून आली, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. त्यामुळे आरोपींना खरेच अटक झाली की, ते शरण आले आणि नंतर त्यांना शिताफीने अटक केल्याचे दाखविले, याचा उलगडा दिवसभरात झाला नाही आणि पोलिसांनीही केला नाही. अटक करणाऱ्या पोलिसांच्या पथकात पूर्वी अंबरनाथमध्ये काम केलेल्या पोलिसांमुळे आरोपींना ओळखणे सोपे गेले, असे स्पष्टीकरण नंतर पोलिसांनी दिले. मात्र, आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याने या काळात हत्येमागील सूत्रधार शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांना पेलावे लागणार आहे.

चेहरे दाखवण्याची घाई का?
एखाद्या गुन्ह्यातील आरोपींचे चेहरे न दाखविता त्यांना न्यायालयात हजर केले जाते. आरोपींची ओळख उघड करण्याबाबत न्यायालयाचेही काही निर्बंध आहेत. तसे आदेश पोलिसांनी यापूर्वीच काढले आहेत. पण, गुंजाळ हत्येतील चारही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आल्यावर लगेचच सोशल मीडियावर त्यांचे फोटो झळकले. त्यामुळे अटक केल्याचे श्रेय घेण्याच्या नादात पोलिसांनी अतिउत्साहात हा प्रकार केल्याची चर्चा नंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांत रंगली होती. मात्र, त्या आरोपींचे हसरे चेहरे व्हायरल झाल्याने गुंजाळ समर्थकांनी संताप व्यक्त केला.

आरोपी अलगद हाती पडल्याचे कोडे
गुंजाळ यांचे मारेकरी हे टिटवाळा पोलिसांपुढे शरण आल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले. मात्र, दुसऱ्या दिवशी पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने या आरोपींना खडवलीच्या एका ढाब्यावरून जेवताना ताब्यात घेतल्याची नोंद केली. असे असले तरी लोकमतचे वृत्त खोडून काढण्याचा कोणताही प्रयत्न पोलिसांनी केला नाही. त्यामुळे आरोपी हजर झाले की, त्यांना ढाब्यावरून अलगद अटक केली, हे कोडे उलगडले नाही.

Web Title: Who is the mastermind of the murder of Gunjal?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.