ठाणे, कल्याण, भिवंडीचा खासदार कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:50 PM2019-05-22T23:50:43+5:302019-05-22T23:51:04+5:30
मतदारराजाचा फायनल कौल कळणार । सकाळी ८ पासून सुरू होणार मतमोजणी । कोणाच्या विजयाचा होणार जल्लोष
ठाणे : ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघांत मतदान झाल्यानंतर आता मतदारांचा कौल आज (गुरुवारी) स्पष्ट होणार आहे. ठाणे कुणाच्या वाट्याला जाणार, कल्याणचा गड शिवसेना राखणार का? आणि भिवंडीत कोणाची होणार सरशी, याकडे आता ठाणे जिल्ह्यातील मतदारांच्या नजरा खिळल्या आहेत.
२९ एप्रिलला या मतदारसंघांत मतदान झाले. ठाणे मतदारसंघात ४९.२३ टक्के मतदान झाले होते. तर, कल्याणमध्ये ४५.२८ टक्के आणि भिवंडीत ५३.०८ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर, आता आज सकाळी तीनही मतदारसंघांत मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी सुरू होणार आहे. ठाण्यात शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांच्याविरुद्ध राष्टÑवादीचे आनंद परांजपे यांच्यात मुख्य लढत झाली. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक अखेरच्या क्षणी ‘काँटे की टक्कर’ ठरली होती. त्यामुळे ठाण्याचा खासदार कोण होणार, याबाबत उत्सुकता आहे. दुसरीकडे कल्याणमध्ये राष्टÑवादीचे बाबाजी पाटील विरुद्ध शिवसेनेचे विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यात लढत झाली. परंतु, राष्टÑवादीने येथे कमकुवत उमेदवार दिल्याची चर्चा आजही असल्याने निकालाचा कौल हा शिवसेनेच्या बाजूने झुकण्याची शक्यता आहे. भिवंडीत भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील विरुद्ध काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे यांच्यात अटीतटीची लढत झाली असल्याने या लढतीत कोणाचे पारडे जड होणार आणि मतदारांचा कौल कोणाचे तोंड गोड करणार, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरले आहे.
या उमेदवारांच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष
राजन विचारे । शिवसेना : शिवसेनेकडून राजन विचारे हे पुन्हा एकदा निवडणूक लढवत असून त्यांच्या विजयाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. नगरसेवक, महापौर, आमदार आणि खासदार असा त्यांचा प्रवास राहिला आहे. परंतु, या निवडणुकीत काँटे की टक्कर झाल्याने त्यांच्या निकालाकडे लक्ष लागले आहे.
डॉ. श्रीकांत शिंदे । शिवसेना : शिवसेनेकडून डॉ. श्रीकांत शिंदे हे दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते पुत्र असल्याने त्यांच्या विजयाचे महत्त्व आणखी वाढले आहे. राष्टÑवादीकडून कमकुवत उमेदवार देण्यात आल्याने शिंदे किती मताधिक्याने निवडून येतात, यावर पैजा लागल्या असून त्यामुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मतमोजणीही होणार रंगीबेरंगीठाणे लोकसभा मतदारसंघात प्रचाराच्या वेळेस निवडणूक विभागाने ज्या पद्धतीने रंगसंगतीचा अवलंब केला होता, तो यशस्वी झाल्याने आता स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या मतपेट्या या त्यात्या विधानसभा क्षेत्राच्या खोल्यांमध्ये मोजणीसाठी नेताना शिपायांकडून गडबड होऊ नये, म्हणून त्यांना खास पोशाख देण्यात आले आहे.