होर्डिंगसाठी पाच लाख रुपये घेणारा ठाण्यातील ‘तो’ खासदार कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 01:36 AM2019-04-05T01:36:04+5:302019-04-05T01:36:25+5:30

जितेंद्र आव्हाडांचा सवाल । भूमिका जाहीर करण्याचे खासदारांना आवाहन

Who is the MP from Thane, who receives Rs five lakh for hoardings? | होर्डिंगसाठी पाच लाख रुपये घेणारा ठाण्यातील ‘तो’ खासदार कोण?

होर्डिंगसाठी पाच लाख रुपये घेणारा ठाण्यातील ‘तो’ खासदार कोण?

Next

ठाणे : डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील होर्डिंग धोकादायक स्थितीत असून ते एका बाजूला कलले आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याचा धोका आहे. उच्च न्यायालयाच्या कोणत्याही निर्देशांचे पालन न केल्याने हे होर्डिंग बेकायदेशीर असल्याचे सिद्ध झालेले आहे; मात्र ठाण्यातील चारपैकी एका खासदाराने या होर्डिंगच्या उभारणीसाठी पाच लाखांचा हप्ता घेतला आहे. ठाणेकरांच्या जीवाशी खेळणारा हा ’अविचारी’ खासदार कोण आहे, असा सवाल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केला.

काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील होर्डिंग पडले आहे. या होर्डिंगची उभारणीच बेकायदेशीरपणे करण्यात आलेली आहे.
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने होर्डिंग उभारण्यासाठी काही निर्देश दिले आहेत. त्यानुसार त्यांची उंची, रंगसंगती, डोळ्यांवर येणारा तणाव आदींसंदर्भात विशिष्ट निकष न्यायालयाने घालून दिले आहेत; मात्र ठाण्यातील एकाही ठिकाणी होर्डिंगचे हे नियम पाळण्यात येत नाहीत. बुधवारी दुर्घटनाग्रस्त झालेले हे होर्डिंग उभारण्यासाठी एका खासदाराने पाच लाख रु पयांचा हप्ता घेतला असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. त्यांनी हा हप्ता भागीदार म्हणून घेतला की, अन्य कोणत्या प्रकारे घेतला, हे माहीत नाही.
ठाण्यात कुमार केतकर, श्रीकांत शिंदे, विनय सहस्रबुद्धे आणि राजन विचारे हे चार खासदार राहतात. केतकर यांच्याशी आपले बोलणे झाले असून ते पत्रकार परिषद घेऊन या प्रकाराशी आपला संबंध नसल्याचे जाहीर करणार आहेत.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पत्रकार परिषद घेऊन आपल्या मुलाचा काही संबंध नसल्याचे जाहीर करावे. विनय सहस्रबुद्धे यांनी विवेकबुद्धीने आपली भूमिका जाहीर करावी. राजन विचारे यांनीही चुकीचा विचार करू नये. त्यांनीही पूर्ण विचारांती आपली भूमिका सांगावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

चार दिवसांत डम्पिंग बंद न झाल्यास आंदोलन
वागळे इस्टेट येथील डम्पिंग ग्राउंडमुळे या भागात राहणाऱ्या सुमारे ३० टक्के नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे चार दिवसांत हे डम्पिंग ग्राउंड बंद न केल्यास ते आपण बंद पाडू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. पर्यावरणाचे कोणतेही निकष न पाळता डम्पिंग ग्राउंड सुरू केले आहे. गेल्या चार दिवसांपासून येथील दुर्गंधीने नागरिक हैराण झाले आहेत.

घरखरेदीत जीएसटीसह एलबीटीचीही वसुली
जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर एलबीटी रद्द करण्यात आलेली आहे; मात्र ठाणे शहरात घरखरेदी करताना जीएसटी आणि एलबीटी असे दोन्ही कर भरावे लागत आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडून एलबीटी घेण्यात आलेली आहे, त्यांना त्यांचे पैसे परत करावेत. तसेच, एलबीटी पूर्णत: बंद करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Web Title: Who is the MP from Thane, who receives Rs five lakh for hoardings?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.