महापालिकेच्या मुंब्रा हॉस्पिटलवरील कोट्यवधींचा खर्च कोणाच्या घशात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:31 AM2021-04-29T04:31:53+5:302021-04-29T04:31:53+5:30
ठाणे : महापालिकेच्या मुंब्रा-कौसा येथील नियोजित हॉस्पिटलवर आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही, तब्बल १३ वर्षांनंतरही हॉस्पिटल सुरू न झाल्यामुळे ...
ठाणे : महापालिकेच्या मुंब्रा-कौसा येथील नियोजित हॉस्पिटलवर आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही, तब्बल १३ वर्षांनंतरही हॉस्पिटल सुरू न झाल्यामुळे नागरिकांना साधे उपचारही घेता येत नाहीत. नियोजित हॉस्पिटलचे कोट्यवधी रुपये कोणाच्या घशात गेले, असा सवाल भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केला आहे.
कौसा येथील प्राइम क्रिटीकेअर हॉस्पिटलला लागलेल्या आगीनंतर चार रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर डावखरे यांनी हॉस्पिटलला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. मुंब्रावासीयांचे सरकारी हॉस्पिटलअभावी हाल होत आहेत. त्याला सत्ताधारी, महापालिका प्रशासन जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला.
प्राइम क्रिटीकेअर हॉस्पिटल अत्यंत दाटीवाटीच्या जागेत उभारले आहे. मात्र, मुंब्र्यात सरकारी आरोग्य सुविधा नसल्यामुळे रुग्णांना नाईलाजाने खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागते, याकडे डावखरे यांनी लक्ष वेधले, तसेच महापालिकेच्या नियोजित हॉस्पिटलवर तब्बल १३ वर्षांपासून आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, हॉस्पिटल उभारले गेले नाही. त्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना मोफत व दर्जेदार उपचार मिळाले असते. मात्र, या हॉस्पिटलकडे जाणूनबुजून सत्ताधारी व प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले.
.............
डोळे उघडण्यासाठी आणखी किती बळी हवेत
वेदांत हॉस्पिटलमधील घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी घोडबंदरच्या दिया हॉस्पिटलमधील रुग्णांना ऑक्सिजनअभावी हलवावे लागले. भंडारा, विरारमधील घटनांमधून सत्ताधारी व महापालिका प्रशासनाने कोणताही धडा शिकलेला नाही. त्यामुळे मुंब्रा येथील आजची घटना घडली. हॉस्पिटलचे फायर ऑडिट करण्याची वारंवार मागणी करण्यात आली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात प्रशासनाने धन्यता मानली. आणखी किती बळी गेल्यावर महापालिकेचे प्रशासनाचे डोळे उघडणार आहेत, असा सवालही डावखरे यांनी केला.
..............
वाचली