पूर्णेकरांचा उत्तराधिकारी कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 02:14 AM2017-08-16T02:14:58+5:302017-08-16T02:15:02+5:30
ठाण्यातील काँग्रेसचे नेते बाळकृष्ण पूर्णेकर व संजय चौपाने यांचे रस्ते अपघातात आकस्मिक निधन झाल्याने ठाणे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
ठाणे : ठाण्यातील काँग्रेसचे नेते बाळकृष्ण पूर्णेकर व संजय चौपाने यांचे रस्ते अपघातात आकस्मिक निधन झाल्याने ठाणे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ठाण्यातील शिवसेनेच्या बलाढ्य साम्राज्याशी लढा देण्याकरिता आता काँग्रेसकडे सक्षम नेतृत्व नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.
ठाण्यातील काँग्रेस संघटनेकडे सातत्याने दुर्लक्ष झाले होते. मात्र, पूर्णेकर यांनी तक्रारी करत न बसता काँग्रेसच्या जनाधाराच्या बळावर पक्षाच्या नगरसेवकांची संख्या वाढवण्याची धमक दाखवली होती. २०१२ च्या निवडणुकीत कॉंग्रेसचे तब्बल १७ नगरसेवक पालिकेवर निवडून आणले होते. विद्यार्थिदशेपासून ते राजकारणात सक्रिय होते. शिवसेनेत विद्यार्थी सेनेपासून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली असल्याने सत्ताधारी शिवसेनेची नेमकी नाडी त्यांना ठाऊक होती. ठाण्यात कायम विरोधी बाकांवर बसण्याची सवय झाल्याने म्हणा किंवा छगन भुजबळांसारख्या आक्रमक विरोधी पक्ष नेत्याने बाळकडू दिल्याने म्हणा, पूर्णेकर हे त्यांच्या आंदोलनाकरिता ओळखले जाणारे काँग्रेस नेते होते. त्यामुळे शिवसेनेतील मंडळीदेखील त्यांना वचकून असायची. त्यांच्यातील कामाची धमक व धडाडी पाहूनच पक्षाने त्यांच्यावर शहर जिल्हा अध्यक्षपदाची धुरा सोपवली आणि त्यांनी ती यशस्वीपणे पार पाडली.
राजकारणात पूर्णेकरांसारखा कार्यकर्ता घडायला २५ ते ३० वर्षे लागतात. मात्र, पूर्णेकरांची जागा घेईल, असा दुसरा कार्यकर्ता सध्या तरी दिसत नाही.