स्थायी सभापतीपदाचा मान कुणाला?, जानेवारीत निवडणूक अपेक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 01:09 AM2018-12-07T01:09:21+5:302018-12-07T01:09:32+5:30
केडीएमसीच्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होणे अपेक्षित आहे.
कल्याण : केडीएमसीच्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होणे अपेक्षित आहे. सभापतीपदाची धुरा कोणाकडे सोपवायची, याचा निर्णय शिवसेनेतील पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. मात्र, सभापतीपद पुन्हा डोंबिवली की कल्याण पश्चिमेकडे जाणार? तसे झाल्यास कल्याण पूर्वेवर अन्याय होणार का? असे तर्कवितर्क राजकीय वर्तुळात लढवले जात आहेत. या वेळेस कल्याण पूर्वेला न्याय मिळावा, अशी अपेक्षा तेथील नगरसेवकांनी व्यक्त केली आहे.
२०१५ मधील महापालिका निवडणुकीनंतर भाजपाला दोन वर्षे, तर शिवसेनेला तीन वर्षे स्थायी समितीचे सभापतीपद दिले जाईल, असा अलिखित करार शिवसेना-भाजपामध्ये झाला होता. मात्र, त्याला पक्षश्रेष्ठींकडून आजघडीला दुजोरा दिला जात नाही. पहिल्या वर्षी भाजपाचे संदीप गायकर, त्यानंतर शिवसेनेचे रमेश म्हात्रे, तर तिसऱ्या वर्षी भाजपाचे राहुल दामले यांना स्थायी समिती सभापतीपद दिले गेले. आता पुन्हा शिवसेनेकडून सभापतीपदावर दावा केला जात आहे. कल्याण पूर्वेतील निलेश शिंदे व महेश गायकवाड हे सदस्य या पदासाठी इच्छुक आहेत. कल्याण पूर्वेतील ज्येष्ठ नगरसेवक मल्लेश शेट्टी यांना स्थायी समिती सदस्यपद न दिल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे कल्याण पश्चिमेतील नगरसेवक जयवंत भोईर आणि गणेश कोट यांचीही नावे सभापतीपदासाठी चर्चेत आहे.
डोंबिवली शहरातून ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे, तरुण नगरसेवक दीपेश म्हात्रे हे देखील सभापतीपदासाठी शर्यतीत आहेत. या दोघांनीही यापूर्वी सभापतीपद भूषवले आहे. आगामी निवडणुका विचारात घेता पक्षाकडून या दोन्ही नावांचा पुन्हा विचार केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सगळ्या इच्छुकांच्या मर्जीचा विचार करून कोणाला एकाला सभापतीपद देणे, हे पक्षासाठी तारेवरची कसरत ठरणार आहे.
>लोकसभेसाठी कल्याण पूर्वेला न्याय?
केडीएमसीतील विविध समित्यांची पदे कल्याण पश्चिम व डोंबिवलीला दिली जातात, अशी कुरबूर नेहमीच पक्षांतर्गत ऐकायला मिळते. कल्याण पूर्वेला न्याय दिला जात नाही, अशी तेथील नगरसेवक, पदाधिकाºयांची तक्रार असते.कल्याण पूर्वेतील अपक्ष आमदार गणपत गायकवाड हे भाजपाच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत तेथील मते मिळवून आपले पारडे जड करण्यासाठी शिवसेनेकडून स्थायी समितीचे सभापतीपद कल्याण पूर्वेला दिले जाऊ शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.