साप पकडायचा कुणी? अग्निशमन आणि वन विभागाच्या कोडींत अडकले सामान्य नागरिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2022 03:28 PM2022-02-26T15:28:56+5:302022-02-26T15:29:01+5:30

सापांना एकाच पेटीत ठेवल्याने व आपसात भांडून एकमेकांना जखमी करणे, सापांना पकडून फोटोसेशन करणे आदी स्वरूपाच्या तक्रारी वन विभागाकडे होऊ लागल्या.

Who wants to catch a snake? Ordinary citizens caught in the trap of fire and forest department in Mira Bhayandar | साप पकडायचा कुणी? अग्निशमन आणि वन विभागाच्या कोडींत अडकले सामान्य नागरिक

साप पकडायचा कुणी? अग्निशमन आणि वन विभागाच्या कोडींत अडकले सामान्य नागरिक

Next

मीरारोड - वन विभागाने मीरा - भाईंदर महानगर पालिकेच्या अग्निशमन दलास साप आदी वन्यजीव पकडू असे आदेश दिले असले तरी नगरसेवक, राजकारणी वा बड्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर मात्र अग्निशमन दल साप पकडण्यासाठी धावून जाते. परंतु सामान्य नागरिकांनी तक्रार केल्यास अग्निशमन दलाकडून हात झटकत वन विभागाला सांगा अशी बोळवण केली जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याने संताप व्यक्त होत असून ह्यावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी होत आहे. 

आताचे मीरा भाईंदर शहर हे पूर्वीची काही गावखेडी, शेती , बागायती, जंगल व कांदळवनचे क्षेत्र होते. शहरीकरणात शेती नष्ट होऊन झाडे , डोंगर , कांदळवन आदी भाग मोठ्या प्रमाणात नष्ट केला जात आहे. जेणे करून आजही शहरातील निवासी व वाणिज्य इमारती, गावठाण भागात मोठ्या प्रमाणात विविध जातीचे साप, अजगर आढळून येतात. हे साप विषारी की बिन विषारी ह्याची माहिती सामान्य नागरिकांना नसल्याने साप दिसला की घबराटसह कुतूहल सुद्धा असते. इतक्या वर्षात साप चावण्याच्या घटना सुद्धा अपवादात्मक अशाच आहेत.

साप शिवाय माकड, सोनेरी कोल्हा, विविध पक्षी आदी शहरी भागात आढळून येतात. नुकताच भाईंदर पश्चिम येथे बिबट्या वाघ वास्तव्यास असल्याचे उघड होऊन त्याला पकडण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षां पासून साप पकडण्याचे काम महापालिकेचे अग्निशमन दल करत आले आहे. साप आल्याचा कॉल केल्यावर अग्निशमन दलाचे जवान साप पकडण्यासाठी घटनास्थळी पोहचतात. परंतु अग्निशमन दलाचे जवान साप पकडताना त्यांची ओळख नसणे, त्यांना नीट न हाताळणे, सापांना एकाच पेटीत ठेवल्याने व आपसात भांडून एकमेकांना जखमी करणे, सापांना पकडून फोटोसेशन करणे आदी स्वरूपाच्या तक्रारी वन विभागाकडे होऊ लागल्या. त्यातूनच वन विभागाच्या मुंबई वनक्षेत्रपाल ह्यांनी पालिकेच्या अग्निशमन दलास पत्र पाठवून वन्यजीवांना इजा पोहचवत असल्याचे पाहता या पुढे  साप व इतर वन्य जीव यांची सुटका करण्यासाठी अग्निशमन दलाने कार्यवाही करू नये. त्यासाठी वन क्षेत्रपाल किंवा नियंत्रण कक्ष येथे संपर्क साधण्याचे आवाहन महापालिका व वन विभागाने केले होते. 

त्या अनुषंगाने नागरी वस्तीत साप आढळून आल्यास नागरिकांनी अग्निशमन दलास कॉल केला असता त्यांना वन विभागाचा क्रमांक देऊन त्यांना सांगा. अग्निशमन दल साप पकडू शकत नाही असे सांगितले जाते. जेणे करून नागरिकांना वन विभागाच्या नियंत्रण कक्षाकडे कॉल करावा लागतो. तेथून मग सर्प मित्रांचे क्रमांक दिले जातात. त्यांच्याशी संपर्क केल्यावर कोणी ठाणे तर कोणी उपनगर असे लांबून येणारे असल्याने मदतकार्य वेळेत पोहचत नाही. जेणे करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण वाढून तणाव निर्माण होतो. त्यातही साप चावण्याची भीती वाढतेच शिवाय काही अति उत्साही सापाला मारण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. 

परंतु सामान्य नागरिकांना साप पकडण्यास येणार नाही, वन विभागाशी संपर्क साधा सांगणारे अग्निशन दलातील काही कर्मचारी नगरसेवकांनी वा मोठ्या अधिकाऱ्याने सांगितल्यावर तात्काळ धावत जातात. महापालिकेची ऑनलाईन महासभा सुरु असताना नगरसेविका प्रभात पाटील यांच्या इंद्रलोक येथील बंगल्यात साप शिरल्याचे दाखवले होते. त्यावेळी देखील अग्निशमन दल तात्काळ नगरसेविकेच्या बंगल्यात धावून जात साप पकडला होता.  विशेष म्हणजे स्वतः नगरसेविकेनेच पालिकेचे कान उपटत मी नगरसेविका आहे म्हणून अग्निशमन दल साप पकडण्यास आले. पण सामान्य नागरिकांसाठी असेच धावून जाणार का? असा सवाल करत पालिकेने पर्यायी व्यवस्था न करता नागरिकांना मात्र वाऱ्यावर सोडल्याचा मुद्दा चर्चेत आणला होता. 

अग्निशमन दलावर नागरिकांच्या जीवित व मालमत्तेची सुरक्षा असल्याने त्यांनी कोणाच्या दबावाखाली काम करणे गंभीर आहे. नागरिकांच्या तक्रारींवर सुद्धा तात्काळ मदतकार्य केले पाहिजे . केवळ नगरसेवकांच्या दबाव वा राजकीय फायद्याच्या राजकारणाला बळी पडून अग्निशमन दलाची प्रतिमा डागाळू नये व सामान्य नागरिकांना वाऱ्यावर सोडू नये. अँड. सुशांत पाटील - स्थानिक नागरिक  

Web Title: Who wants to catch a snake? Ordinary citizens caught in the trap of fire and forest department in Mira Bhayandar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.