अटीतटीच्या लढतीत ‘बाजीगर’ ठरणार कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 12:32 AM2019-10-18T00:32:59+5:302019-10-18T00:33:03+5:30

प्रचार पोहोचला शिगेला : बंडखोरीमुळे साऱ्यांचेच लागले लक्ष

Who will be a 'Bajigar' in a election contest? | अटीतटीच्या लढतीत ‘बाजीगर’ ठरणार कोण?

अटीतटीच्या लढतीत ‘बाजीगर’ ठरणार कोण?

Next

कल्याण : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात प्रचार शिगेला पोहोचला आहे. सध्या प्रचाररॅली, चौकसभा, बाइकरॅली आणि वैयक्तिक गाठीभेटींच्या माध्यमातून येथील उमेदवारांकडून मतदारसंघ पिंजून काढला जात आहे. अरुंद रस्ते, मैदान-उद्यानांची कमतरता, विकास प्रकल्पांची अपूर्ण कामे, वाहतूककोंडी, अनधिकृत बांधकामे, कचरा डम्पिंग आदी स्थानिक मुद्यांभोवती उमेदवारांचा प्रचार फिरत आहे. शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता प्रचाराची सांगता होणार आहे. तत्पूर्वी प्रचाराला अधिकच गती येणार आहे. या मतदारसंघात बंडखोरी झाल्याने चुरशीच्या लढाईत कोण बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


कल्याण पूर्व मतदारसंघात १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गणपत गायकवाड (भाजप), प्रकाश तरे (राष्ट्रवादी काँग्रेस), मिलिंद बेळमकर (बहुजन समाज पार्टी), अश्विनी थोरात-धुमाळ (वंचित बहुजन आघाडी), सचिन चिकणे (समाजवादी फॉरवर्ड ब्लॉक), अभिजित त्रिभुवन (बहुजन मुक्ती पार्टी), उदय रसाळ (प्रहार जनशक्ती पक्ष), हरिश्चंद्र पाटील (संघर्ष सेना) यांच्यासह ११ अपक्ष उमेदवार येथे आहेत. भाजपचे उमेदवार गायकवाड यांच्यासमोर शिवसेनेचे उल्हासनगरमधील विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. तर, काँग्रेसचे शैलेश तिवारी हे देखील बंडखोरी करीत अपक्ष लढत असल्याने राष्ट्रवादीच्या तरे यांची डोकेदुखी वाढली आहे.


आता निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात बंडखोरांसह सर्वच उमेदवारांकडून सुरू असलेला प्रचार शिगेला पोहोचल्याचे दिसत आहे. दहा वर्षांच्या कालावधीत नगरसेवक म्हणून केलेल्या कामांचे दाखले तरे यांच्याकडून प्रचारात दिले जात आहेत. क्लस्टर, कुशिवली धरण, मलंगगडावरील फ्युनिक्युलर ट्रॉलीचे प्रलंबित काम, १०० फुटी रस्त्याचे अपूर्ण काम, यू-टाइप रस्त्याचे रखडलेले काम, रहिवाशांचे पुनर्वसन आदी मुद्यांवरही तरेंचा प्रचार सुरू आहे. आतापर्यंत उल्हासनगर, मलंगगडपट्टा ग्रामीण भाग, खडेगोळवली, काटेमानिवली, कोळसेवाडी या भागांमध्ये प्रचार झाला आहे. आता उर्वरित पट्ट्यात दोन दिवसांत प्रचार केला जाणार आहे.


गुरुवारी तिसगाव, विजयनगर आमराई, संतोषनगर या भागातील घरोघरी भेटी देऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. पूर्वेकडील स्थानकाला भेट देऊन प्रवाशांच्या समस्याही तरेंनी जाणून घेतल्या. बंडखोरी करणारे शिवसेनेचे धनंजय बोडारे यांचाही आतापर्यंत खडेगोळवली, कैलासनगर, भगवाननगर, काटेमानिवली, विठ्ठलवाडी परिसर, कोळसेवाडी, विजयनगर, चिंचपाडा, तिसगावपाडा, चक्कीनाका, नांदिवलीमध्ये प्रचार झाला आहे. गुरुवारी ग्रामीण भागात त्यांनी रॅली काढली होती. यात १४ गावांमध्ये त्यांनी प्रचार केला. बोडारे यांना पूर्वेतील बहुतांश सेना नगरसेवकांचा पाठिंबा लाभला आहे. बोडारेंच्या प्रचारामध्ये नगरसेवकांनी हिरिरीने सहभाग घेतल्याचे चित्र दिसून येते. गेल्या १० वर्षांत मतदारसंघात कोणतीही विकासकामे झालेली नाहीत. उद्यान मैदानांची कमतरता, सरकारी रुग्णालयांची वानवा, विरंगुळा केंद्र न उभारणे, रस्ते, पाणीप्रश्न आदी मुद्यांभोवती बोडारे यांचा प्रचार फिरत आहे. रॅलीसह घरोघरी प्रचार करणाऱ्यांवर त्यांचा भर राहिला आहे. ‘आपलं ठरलंय, शेठ नको विकास हवा, आता बदल हवा’ हे ब्रीदवाक्य घेऊन बोडारेंचा प्रचार सुरू आहे.

दरम्यान, या मतदारसंघात गेल्या दोन वेळेस आमदार राहिलेले भाजपचे उमेदवार गणपत गायकवाड यांनीदेखील गुरुवारी प्रचाररॅली काढली होती. श्रीराम टॉकीज येथून प्रारंभ झालेली रॅली आंबेडकर चौक, कैलासनगर, एफ केबिन, गणपती चौक, सिद्धार्थनगर, तिसगाव चौक अशी काढण्यात आली होती. प्रचारादरम्यान गायकवाड यांच्याकडून विरोधकांचा समाचार घेतला जात आहे. दहा वर्षांत केलेल्या विकासकामांची माहिती देताना विरोधकांनी केलेली अनधिकृत बांधकामे, भ्रष्टाचार आदी मुद्यांकडे ते लक्ष वेधत आहेत. ‘प्रचाराची रॅली नाही तर विकासाची आणि प्रगतीची दिशा ठरवणारी रॅली’ असा उल्लेख त्यांच्याकडून केला जात आहे. आतापर्यंत त्यांनी चक्कीनाका, शंभर फुटी रोड यासह पूर्वेतील बहुतांश भागासह मलंगगड पट्ट्यातील ग्रामीण भागात प्रचार केला आहे. अन्य राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षही प्रचाररॅलीद्वारे मतदारांशी थेट संपर्क साधताना दिसत आहेत.

पूर्वेत बड्या नेत्यांच्या सभा, मेळावे
पूर्व मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे, रिपाइंचे रामदास आठवले, भाजपचे मनोज तिवारी, श्वेता शालिनी, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या सभा व मेळावे झाले आहेत. एवढेच नव्हे तर प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने का होईना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या मतदारसंघात पायधूळ झाडली आहे. अंतिम टप्प्यात अधिक जोमाने प्रचार सुरू असला, तरी ‘कल्याण पूर्व’ कोणाचे, हे मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.

Web Title: Who will be a 'Bajigar' in a election contest?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.