ठाणे ग्रामीणमधील अवैध धंद्यांसह गुन्हेगारांना वेसण घालणार- शिवाजी राठोड

By जितेंद्र कालेकर | Published: August 3, 2018 11:30 PM2018-08-03T23:30:45+5:302018-08-03T23:30:45+5:30

पोलीस-जनता यांच्यात सुसंवाद निर्माण करून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही ठाणे ग्रामीणचे नवे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी शुक्रवारी दिली. ठाण्याची सूत्रे घेतल्यानंतर ‘लोकमत’शी मनमोकळेपणाने बातचीत करताना त्यांनी हा मानस व्यक्त केला.

who will be involved in illegal activities in Thane, will be punished:Shivaji Rathod | ठाणे ग्रामीणमधील अवैध धंद्यांसह गुन्हेगारांना वेसण घालणार- शिवाजी राठोड

ठाणे पोलीस अधीक्षकपदाची घेतली सूत्रे

googlenewsNext
ठळक मुद्देकौटुंबिक मेळाव्यात तणाव दूर करणारनागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणार ठाणे पोलीस अधीक्षकपदाची घेतली सूत्रे

जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे ग्रामीण भागातील अवैध धंदे आणि कुख्यात गुन्हेगारांचा बीमोड केला जाईल. कामात कुचराई करणाऱ्या पोलिसांवर प्रसंगी कारवाई केली जाईल. पोलीस-जनता यांच्यात सुसंवाद निर्माण करून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही ठाणे ग्रामीणचे नवे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी शुक्रवारी दिली. ठाण्याची सूत्रे घेतल्यानंतर ‘लोकमत’शी मनमोकळेपणाने बातचीत करताना त्यांनी हा मनोदय व्यक्त केला.
डॉ. राठोड हे यापूर्वीही २००९ ते २०११ या कालावधीमध्ये ठाणे मुख्यालयात होते. २०११ ते २०१४ या काळात उल्हासनगरच्या उपायुक्तपदी त्यांनी आपली कारकीर्द गाजवली. त्यावेळी पप्पू कलानी यांना त्यांनी निवडणूक काळात अटकही केली होती. वेळ आणि शिस्तीचा लातूरमध्ये अधीक्षकपदी दबदबा निर्माण केलेल्या डॉ. राठोड यांनी मराठा मोर्चा आंदोलनासह अनेक प्रकरणे कौशल्याने हाताळली. अविनाश चव्हाण या खासगी क्लासचालकाच्या खून प्रकरणाचा २४ तासांतच छडा लावून आठ जणांना अटक केली. ‘मनोमिलन’ या अनोख्या उपक्रमांतर्गत भांडणामुळे विभक्त होण्याच्या वाटेवर असलेल्या सुमारे एक हजारांपेक्षा अधिक दाम्पत्यांचा संसार त्यांनी गेल्या तीन वर्षांत नव्याने फुलवला. स्वत: गायक असल्यामुळे महंमद रफी यांच्या आवाजातील ‘बहारों फुल बरसाओ...’ हे गाणे ते ‘मनोमिलना’च्या उपक्रमात गाऊन अशा जोडप्यांना त्यांच्या विवाहाच्या प्रसंगाची आठवण करून देत असल्याचेही त्यांनी सांगितले. गायनाच्या आवडीमुळे पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही त्यांनी एक सांस्कृतिक व्यासपीठ तयार केले. पोलीस स्रेहमेळाव्यातून स्वत: गाणी गात असल्यामुळे पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा कामावरील ताणतणाव आपोआपच दूर होत असल्याचे ते विश्वासाने सांगतात.
चुकून घडलेल्या गुन्ह्यांमुळे एखाद्याला शिक्षा झाल्यानंतर शिक्षा भोगून आलेल्या व्यक्तीचे ‘परिवर्तन’ या कार्यक्रमात मनोगत ठेवून इतरांनी अशा गुन्ह्यांकडे न वळण्यासाठी प्रेरित केले जाते. बळीराजा सबलीकरण या मोहिमेंतर्गत लग्न किंवा इतर कार्यक्रमात डॉल्बी वाजवण्याला बंदी आणून तोच खर्च शेतकºयांच्या मदतीसाठी दिला. लातूरमध्ये अशी २५ लाखांची मदत लोकांनी करण्यासाठी त्यांचे मन वळवल्याची आठवणही त्यांनी सांगितली.
ठाण्यातील अवैध धंदे आणि गावठी दारूविरुद्धची मोहीम यापुढेही अशाच प्रकारे व्यापकपणे चालू ठेवणार आहे. कुख्यात गुन्हेगारांवर मकोका आणि हद्दपारीची कारवाई करणार आहे. आरोपी दत्तक योजनेंतर्गत एक पोलीस एका आरोपीच्या हालचालींवर नजर ठेवेल. पोलीस आणि जनता संबंध दृढ करण्यावर भर देणार असून पोलीस ठाण्यात येणाºया प्रत्येकाचे समाधान करण्याच्या सूचनाही देण्यात येतील. त्यातून पोलिसांचीही प्रतिमा सुधारण्यास मदत होईल. शून्य पेंडन्सीद्वारे गुन्हे आणि अर्ज निकाली काढण्यावरही भर देणार असून गैरकृत्य आणि कामात कुचराई करणाºया पोलिसांवर तसेच अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारणार असल्याचा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
....................
रोज १० किलोमीटर चालणे
गायनाची आवड असलेल्या डॉ. राठोड यांना चालण्याचीही आवड असून ते रोज १० किलोमीटर नियमित चालत असल्याचे सांगतात. गेल्या आठ वर्षांमध्ये यात खंड झालेला नसून चालण्यामुळे शरीरही तंदुरुस्त राहते. त्यामुळे ठाण्यातील पोलिसांमध्येही ही सवय आपण रुजवणार असल्याचे ते म्हणाले.
............................
दरम्यान, मावळते अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी ठाण्याची सूत्रे डॉ. राठोड यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर त्यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची सूत्रे घेतली. ठाणे ग्रामीणच्या जनतेचे चांगले सहकार्य लाभले. ठाण्यात अवैध गावठी दारु बंदीबरोबरच अनेक क्लीष्ट गुन्हयांचा छडा लावल्याचे समधान असल्याचेही ते म्हणाले.
 

Web Title: who will be involved in illegal activities in Thane, will be punished:Shivaji Rathod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.