कोणाचे होणार ‘कल्याण’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:17 AM2019-05-23T00:17:33+5:302019-05-23T00:17:43+5:30

आज मतमोजणी : वाढीव मतदानाचा लाभ कोणाला?

Who will be the 'Kalyan'! | कोणाचे होणार ‘कल्याण’!

कोणाचे होणार ‘कल्याण’!

Next

कल्याण : कल्याण लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात २८ उमेदवार उभे ठाकले होते. परंतु, खरी लढत शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्यात पाहायला मिळाली. २०१४ च्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी काहीशी वाढली आहे. हे वाढीव मतदान कोणासाठी लाभदायक ठरते, याबाबत उत्सुकता लागली असून गुरुवारी होणाऱ्या मतमोजणीत ‘कल्याण’ होणार तरी कोणाचे, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.


आगरी, मराठा-कुणबी व अन्य बहुभाषिकांसह मुस्लिम, दलित, सिंधी व उत्तर भारतीयांची मते येथे निर्णायक असताना भूमिपुत्र विरुद्ध उच्चशिक्षित, विकास विरुद्ध जात हेच मुद्दे प्रामुख्याने येथील प्रचारात राहिले. निवडणुकीच्या रिंगणात जरी श्रीकांत शिंदे व बाबाजी पाटील असले तरी मुलामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि स्वत: न लढता काम करू, असा शब्द दिल्याने राष्ट्रवादीचे माजी मंत्री गणेश नाईक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
२०१४ मध्ये शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे अडीच लाखांच्या मताधिक्याने निवडून आले होते. त्यावेळी ४२.८८ टक्के मतदान झाले होते. यंदा ४५.२८ टक्के मतदान झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत त्यात २.४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही वाढलेली मते कोणाच्या पारड्यात पडणार, हे चित्र मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.


कल्याण लोकसभाअंतर्गत येणाºया अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीत मागच्या तुलनेत आठ, तर उल्हासनगरमध्ये १० टक्क्यांनी मतांमध्ये वाढ झाली आहे. उर्वरित चार मतदारसंघांमध्येही ४० टक्क्यांवर मतदानाची आकडेवारी राहिली आहे.
दरम्यान, एकूणच मागील लोकसभेच्या तुलनेत यंदा मतदानाच्या टक्केवारीत विधानसभानिहाय चढउतार पाहायला मिळाले असले तरी वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर, हे चित्र मतमोजणीअंती स्पष्ट होणार आहे.


डोंबिवलीत घसरली टक्केवारी
राष्ट्रवादीचे उमेदवार पाटील यांनी प्रचारात स्थानिक भूमिपुत्राचा मुद्दा आळवला होता. त्यामुळे ते स्थानिक असलेल्या कल्याण ग्रामीणमध्ये मतदानाची टक्केवारी वाढेल, अशी अपेक्षा होती. परंतु, यंदा तेथे गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदान दोन टक्के कमी झाले आहे.
ज्या मुंब्रा-कळवा मतदारसंघात राष्ट्रवादीला गतवेळेला मतांमध्ये आघाडी मिळाली, तेथेदेखील काहीसे मतदान कमी झाले आहे. शिवसेना-भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या डोंबिवली आणि कल्याण पूर्वेतही अनुक्रमे दोन आणि तीन टक्क्यांनी मतदान घसरले आहे.

Web Title: Who will be the 'Kalyan'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.