पुढचा पंतप्रधान कोण असेल? बावनकुळे पोहोचले थेट दुकानात, महिलेने सांगितले चुलीवरची लाभार्थी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 09:52 AM2023-10-18T09:52:47+5:302023-10-18T09:54:23+5:30

‘लोकसभा प्रवासा’अंतर्गत भाजपचे शक्तिप्रदर्शन : साधला संवाद

Who will be the next prime minister? Bawankule reached directly to the shop, asking people how is life | पुढचा पंतप्रधान कोण असेल? बावनकुळे पोहोचले थेट दुकानात, महिलेने सांगितले चुलीवरची लाभार्थी

पुढचा पंतप्रधान कोण असेल? बावनकुळे पोहोचले थेट दुकानात, महिलेने सांगितले चुलीवरची लाभार्थी

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : नवरात्रानिमित्त ठाण्यातील बाजारपेठेत तुफान गर्दी झालेली असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व त्यांच्यासोबत किमान दोनेकशे भाजप कार्यकर्ते मंगळवारी ठाण्यातील वेगवेगळ्या दुकानांत शिरून व्यापारी, कर्मचारी, ग्राहक यांना गाठून ‘तुम्हाला देशाच्या पंतप्रधानपदी कोण हवंय’, असा सवाल करीत होते. भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी तोंडावर बावनकुळे यांचेच मुखवटे परिधान केले असल्याने एकाचवेळी मूळ बावनकुळे व त्यांचे पन्नासेक मुखवटाधारी यांच्या प्रश्नाला आपसूक ‘नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान हवे’ हे उत्तर मिळत होते. मात्र मोदीच का हवे, या बावनकुळेंच्या प्रश्नावर अनेकांची गाडी अडत होती. मात्र नरेंद्र मोदी यांना ठाण्यातील बाजारपेठेत मिळालेला हा उदंड पाठिंबा पाहून बावनकुळे हे आनंदून गेले.

नवरात्रीनिमित्त ठाण्यातील बाजारपेठेत सध्या खूप गर्दी होते. ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील महिला फुले व अन्य पूजेचे साहित्य विकण्याकरिता कुटुंबकबिल्यासह ठाण्यात दाखल झाल्या आहेत. त्यातच रिक्षा, स्कूटर, मोटारी बाजारपेठेतून जात असल्याने अक्षरश: मुंगीलाही पाऊल ठेवायला बाजारपेठेत जागा नसते. 
त्याचवेळी बावनकुळे आपल्या २०० ते ३०० कार्यकर्ते, पदाधिकारी यांना घेऊन या गर्दीत दाखल झाले. बावनकुळे यांच्या हातात वाहिनीच्या पत्रकारासारखा माइक होता.  बावनकुळे यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना मात्र अनेकांची भंबेरी उडाली.

बाजारपेठेत प्रत्येकाला पंतप्रधानपदाबाबत जनभावना समजावी याकरिता माइक स्पीकरला जोडला होता. बावनकुळे एका दुकानात गेले. तेथे ग्राहकांची गर्दी होती. त्या गर्दीतून वाट काढत ते गल्ल्यावरील दुकान मालकांपर्यंत गेले व त्यांनी माइक पुढे करून त्यांना तुम्हाला पंतप्रधानपदी कोण हवे, असा थेट सवाल केला. गल्ल्यातून मान वर करून पाहिलेल्या शेठला समोर खुद्द बावनकुळे दिसताच त्याने नरेंद्र मोदीच हवे, असे सांगितले. 

हातामधील पिशव्या सावरत बाजारपेठेतून वाट काढणाऱ्या ग्राहकांनाही बावनकुळे यांनी तोच प्रश्न केला. जवळपास सर्वांनी नमो नमो केले. भाजपच्या महाविजय २०२४ अभियानांतर्गत लोकसभा प्रवास योजनेंतर्गत बावनकुळे यांच्या दौऱ्याची भाजपने जोरदार तयारी केली होती. बाजारपेठ, मुख्य चौकात फलकबाजी करण्यात आली होती. बावनकुळे यांनी गडकरी रंगायतन येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

त्यानंतर त्यांनी ठाण्यातील तहसील कार्यालय ते जांभळीनाकापर्यंत व्यापारी, भाजी विक्रेते, ग्राहक यांच्याशी संवाद साधला. एका व्यापाऱ्याने पुढील १०० वर्षे आम्हाला मोदीच पंतप्रधान हवेत असे सांगत जय श्रीरामची घोषणा दिली. मोदी का हवेत, या बावनकुळे यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना मात्र अनेकांची भंबेरी उडाली. एका महिलेने मोदीच का? या प्रश्नावर समाधानकारक उत्तर न सुचल्याने जो आमची कामे करेल त्यांना आम्ही निवडून देऊ, असे म्हणत बावनकुळे यांच्या प्रश्नाचे उत्तर टाळले.

चुलीवरील जेवणाची लाभार्थ्यांकडून कबुली
भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी लाभार्थी म्हणून येऊरच्या आदिवासी महिलांना बोलावले होते. बावनकुळे यांची प्रतीक्षा करत या महिला सावलीमध्ये उभ्या होत्या. महिलांच्या हाती ‘मी लाभार्थी’ अशा आशयाचे फलक दिले होते. या विषयी महिलांना विचारले असता, त्यांना आपण कसले ‘लाभार्थी’ आहोत याचे उत्तर देता आले नाही. एका महिलेने  आता सिलिंडरचा परवडत नसल्या जेवण चुलीवरच बनवत असल्याचे सांगितले.

रॅलीमुळे वाहतूककोंडी
भाजपच्या या रॅलीमुळे बाजारपेठेतील बसची वाहतूक तलवापाळी मार्गे वळविली होती. त्यामुळे या मार्गावर काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती.

Web Title: Who will be the next prime minister? Bawankule reached directly to the shop, asking people how is life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.