रिक्षाचालकांच्या गुंडगिरीला लगाम घालणार कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:27 AM2021-09-02T05:27:13+5:302021-09-02T05:27:13+5:30
प्रशांत माने लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : रिक्षाचालक छेडछाड करत असल्याने तरुणीने धावत्या रिक्षातून उडी मारल्याची घटना नुकतीच औरंगाबाद ...
प्रशांत माने
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : रिक्षाचालक छेडछाड करत असल्याने तरुणीने धावत्या रिक्षातून उडी मारल्याची घटना नुकतीच औरंगाबाद जिल्ह्यातील जालना रोडवर घडली. रिक्षाचालकांच्या गुन्हेगारीचा प्रत्यय सर्वच ठिकाणी प्रवाशांना येत असताना कल्याण-डोंबिवलीतील चित्रही फारसे वेगळे नाही. त्यात आता रिक्षाचे स्टेअरिंग अल्पवयीन टवाळखोरांच्या हाती गेल्याने प्रवासही धोक्याचा झाला आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही त्याकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत आहे.
रिक्षाचालकाकडे वाहन चालवण्याचा परवाना आणि बॅच असणे बंधनकारक आहे; परंतु काही रिक्षाचालक बॅच आणि परवाना नसलेल्यांनाही रिक्षा चालवायला देत आहेत. यात १५ ते १६ वर्षांची मुलेही सरार्सपणे रिक्षा चालविताना दिसत आहेत. ते गणवेश न घालता बरमुडा, हाफ पॅन्ट अशा पेहरावात रिक्षा चालवतात. तसेच स्टॅण्ड सोडून भाडे घेतात. तोंडात गुटखा, मावा भरलेला असतो. अनेक जण रात्रीच्या वेळेस मद्यपान, चरस व गांजाचे व्यसनही करतात. उद्धट, उर्मट वागणूक, मनमानी भाडेआकारणी, असे चित्र कल्याण-डोंबिवलीत बहुतांश ठिकाणी पाहायला मिळते.
दरम्यान, त्यांच्या अशा वर्तवणुकीमुळे सर्वसामान्य प्रामाणिक रिक्षाचालक भरडला जात असून, यात रिक्षा व्यवसायही एक प्रकारे बदनाम होत आहे. एकट्या-दुकट्या प्रवाशाला अज्ञात स्थळी नेऊन लुटणे, विनयभंग, पोलिसांशी हुज्जत घालणे, फरपटत नेणे, असे प्रकार घडले आहेत. प्रवाशांचा मोबाइल, रोकड तसेच सोने-चांदीचे दागिने लुबाडण्याच्या घटनाही सहप्रवाशांकडून घडल्या आहेत. या गुन्ह्यांत रिक्षाचालकांचाही सहभाग दिसून आला आहे.
-------------------------------------------
या घटनांना जबाबदार कोण?
रिक्षाचालकाने काढली तरुणीची छेड
कल्याण पूर्वेतील एका तरुणीची रिक्षाचालकाने छेड काढल्याने तिने तिच्या मित्रांना बोलावले, तर रिक्षाचालकाने त्याच्या साथीदारांना बोलावून घेतले. रिक्षाचालकाच्या साथीदारांनी तरुणी व तिच्या दोन मित्रांना पट्ट्याने बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ही घटना जुलैमध्ये घडली होती. या घटनेच्या नऊ तासांनंतर कोळसेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.
--------------------------
कोरोना नियमाचा आग्रह, प्रवाशाला चोप
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिक्षातून चालकासह दोन जणांनाच प्रवास करण्याची मुभा जुलैमध्ये होती; परंतु एका रिक्षाचालकाकडून हे नियम धाब्यावर बसविले जात असताना नियमांचे पालन करण्याचा आग्रह धरणाऱ्या प्रवाशाला रिक्षाचालकाने मारहाण केली होती. ही घटना विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षा स्टॅण्डजवळ जुलैच्या मध्यात घडली होती. याप्रकरणीही कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
-------------------------------------------
विनापरवाना रिक्षाचालक एक डोकेदुखी
विनापरवाना रिक्षा चालविणाऱ्या मुलांविरोधात वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने भविष्यात कोणती दुर्घटना घडली तर आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही, असा पवित्रा आधीच येथील रिक्षाचालक-मालक असोसिएशनने घेतला आहे. रिक्षांची वाढती संख्या पाहता परवान्यांचे वाटप थांबवा, अशीही त्यांची मागणी आहे.
------------------------------------------
केवळ कारवाईचे दावे
वाहतूक पोलीस व आरटीओ यांच्याकडून कारवाईचे दावे केले जात असले, तरी आजही कल्याण व डोंबिवली रेल्वेस्थानक परिसरातील स्टॅण्डवरील चित्र पाहता बिनधास्तपणे अल्पवयीन रिक्षाचालक रिक्षा लावून भाडे घेत आहेत. मुजोरी, वादावादी असे प्रकार वारंवार त्यांच्याकडून घडत असतात. गेल्या काही दिवसांपासून कल्याणमध्ये बेकायदा रिक्षाचालकांविरोधात कारवाईची मोहीम उघडण्यात आली आहे; पण यात कितपत सातत्य राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
-----------------------