विद्या पाटील यांना न्याय कोण देणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:29 AM2021-06-02T04:29:54+5:302021-06-02T04:29:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कळवा रेल्वेस्थानकात मोबाईल चोराशी झालेल्या झटापटीत विद्या पाटील (३५) या नोकरदार महिलेचा अपघाती बळी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कळवा रेल्वेस्थानकात मोबाईल चोराशी झालेल्या झटापटीत विद्या पाटील (३५) या नोकरदार महिलेचा अपघाती बळी गेला आहे. ही घटना अत्यंत गंभीर असून रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणांच्या निष्क्रियतेचा आम्ही निषेध करीत आहोत. पाटील व त्यांच्या कुटुंबाला न्याय कोण देणार, असा सवाल उपनगरीय प्रवासी महासंघाने केला आहे.
सर्व रेल्वेस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यापासून रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणा सुस्त झाल्या आहेत, असे महासंघाचे निरीक्षण आहे. स्थानक व परिसरात पूर्वीप्रमाणे रेल्वे सुरक्षा दलाचे जवान नियमित गस्त घालत नाही. त्यामुळे गर्दुल्ले, फेरीवाले, चोर यांचा वावर थेट लोकलमध्ये वाढला आहे. सध्या कोरोनामुळे सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासबंदी असूनही या घटनेतील मोबाईलचोर लोकलमध्ये आलाच कसा? या सर्व घटनेची चौकशी करून, यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. तसेच या घटनेतील पाटील यांच्या परिवाराला योग्य ती आर्थिक भरपाई देऊन न्याय देण्याचे काम रेल्वे प्रशासनाने तातडीने करावे, अशी महासंघाची मागणी असल्याचे संस्थापक सदस्य मनोहर शेलार यांनी सांगितले. दरम्यान, पुन्हा अशी घटना घडू नये, यासाठी रेल्वे सुरक्षायंत्रणांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करीत असल्याचे महासंघाचे म्हणणे आहे.
----------------