घाऊकला फटका, किरकोळ विक्रेत्यांची चलती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:38 AM2021-05-17T04:38:31+5:302021-05-17T04:38:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने १५ एप्रिलपासून कल्याण डोंबिवलीत लागू असलेल्या लॉकडाऊनचा फटका ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने १५ एप्रिलपासून कल्याण डोंबिवलीत लागू असलेल्या लॉकडाऊनचा फटका आंबा व्यापाऱ्यांना बसला आहे. लॉकडाऊन व संचारबंदीमुळे व्यापाऱ्यांना व्यापार करण्यासाठी दिलेल्या कमी वेळेमुळे व्यापारी माल कमी मागवीत आहे. त्यामुळे बाजारात हापूस असला तरी कर्नाटकचा हापूस आंब्याची विक्री जास्त होत आहे. घाऊक बाजारात आंब्याचा भाव मागच्या वर्षीच्या तुलनेत दीडपटीने कमी झाला आहे, तर किरकोळ बाजारात आंबा विक्रेत्यांना चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात जास्त भावाने हापूस विकला जात आहे. घाऊकला फटका, तर किरकोळ विक्रेत्यांची चलती आहे. तरीही हापूसचा दर हा ग्राहकाला महागच आहे.
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत आंब्याचा व्यापार करणारे घाऊक व्यापारी किशोर घनश्यामदास यांनी सांगितले की, त्यांच्याकडून सहा डझन हापूस आंब्याची एक पेटी दोन हजार १०० रुपये किमतीला विकली जाते. किरकोळ व्यापारी त्यांच्याकडून ही पेटी घेऊन जातात. किरकोळ बाजारात एक डझन हापूस आंबा हा ४५० ते ५०० रुपये दराने विकला जात आहे. बाजारात कर्नाटक हापूस आंबाही आहे. तो घाऊक बाजारात ३० ते ५० रुपये किलो दराने विकला जात असला तरी किरकोळ बाजारात त्याला ५० ते ७० रुपये किलोचा दर मिळत आहे. त्यामुळे हापूसचे भाव आजही जास्त असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
लक्ष्मी भाजीपाला व फळ बाजारातील व्यापारी बिसमिल्ला शेख यांनी सांगितले की, मागच्यावर्षी मार्च महिन्यापासून लॉकडाऊन होते. त्यावेळी अत्यंत कडक लॉकडाऊन असल्याने आंब्याचा व्यापार जास्त झाला नाही. त्यानंतर जानेवारी महिन्यात लॉकडाऊऩ शिथिल झाले. तेव्हा व्यापाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली त्यामुळे मार्च महिन्यापासूनच कल्याण-डोंबिवली महापालिकेने कडक निर्बंध लागू केले. त्यानंतर राज्याच्या आदेशाने एप्रिलपासून लॉकडाऊन आहे. त्यात व्यापाऱ्यांना व्यापारासाठी दिलेली वेळही कमी आहे. चार तासांत व्यापार कसा होणार, ग्राहक बाजारात जास्त प्रमाणात दिसून येत नाही. त्यामुळे मालाला उठाव नाही. गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील शेतकरी हे आंबा पाठवू का अशी विचारणा करतात. माल मागवून काय करणार. बाजारात मालाला उठावच नाही. त्यामुळे आम्ही व्यापारी कमीच माल मागवितो.
--------------
सामान्यांची या आंब्याला पसंती
हापूसच्या जोडीला केशर, पायरी, गावरान आंब्यांचीही विक्री केली जात आहे. त्याचबरोबर दशेरी हा आंबा उत्तर भारतातून येतो. त्यालाही मागणी आहे. सध्या बाजारात केशर आणि दशेरी आंब्यांची चलती आहे. त्याच्या जोडीला तोतापुरी, अलिबाग, बदाम या आंब्याची विक्री होत आहे. सामान्यांना हापूस परवडत नसल्याने त्यांच्याकडून तोतापुरी, बदाम आणि अलिबाग आंब्याला पसंती दिली जात आहे.
------------
खरा आंबा रायवळ
या आंब्यांच्या जातीसह रायवळ आंबाही बाजारात आसपासच्या गाव खेड्यातून येतो. त्यात ठाणे आणि नाशिकच्या जंगल आणि सह्याद्रीच्या दऱ्या खोरीतून येतो. हा रायवळ आंबा हा आदिवासी बांधव विक्रीला आणतात. त्यात शेऱ्या आंबा आणि चोख्या आंबा, खोबऱ्या आंबा अशा रायवळ जाती आहे. रायवळ आंबा हा टिकला पाहिजे. कारण खरा आंबा तोच आहे. हापूस हा कलमी आंबा आहे. रायवळ टिकविण्यासाठी कॉस्मॉस इकॉलॉजीलिक संस्थेचे प्रमुख डॉ. प्रा. उदयकुमार पाध्ये प्रयत्नशील आहेत.
-----------
आंब्याचे दर
हापूस (रत्नागिरी)-४५० ते ५०० रुपये डझन
हापूस (कर्नाटक)- ७० रुपये प्रति किलो
-------------
किरकाेळ बाजारातील आंब्याचे प्रति किलो दर
केशर- १०० रुपये
पायरी- ८० रुपये
गावरान- ६० रुपये
-------------
घाऊक बाजारातील आंब्याचे प्रति किलो दर
केशर- ७० रुपये
पायरी- ४० रुपये
गावरान- ३० रुपये
-------------