वांगणी परिसरातील बिबट्या गेला कुणीकडे?; सतर्क राहण्याचे केले आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 11:44 PM2020-10-10T23:44:18+5:302020-10-10T23:44:26+5:30

संडे अँकर । नागरिकांमध्ये भीती : वनविभागाने केल्या विविध उपाययोजना 

To whom did the leopards in the Wangani area go ?; An appeal to be vigilant | वांगणी परिसरातील बिबट्या गेला कुणीकडे?; सतर्क राहण्याचे केले आवाहन

वांगणी परिसरातील बिबट्या गेला कुणीकडे?; सतर्क राहण्याचे केले आवाहन

googlenewsNext

बदलापूर : सुमारे पंधरवड्यापूर्वी वांगणीतील कडवपाडा परिसरात बिबट्या आढळून आल्याने खळबळ उडाली होती. मात्र, काही दिवसांपासून हा बिबट्या दिसत नसल्याने तो गेला तरी कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बिबट्या आजूबाजूच्या गावांत शिरू नये, यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे.

बिबट्या दिसल्याची माहिती स्थानिकांनी वनविभागाला दिली होती. त्यानंतर पथकाने जाऊन पाहणी केली होती. त्याचप्रमाणे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले होते. मात्र, अद्याप या बिबट्याचा थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर बिबट्याचा शोध घेण्यासाठी वनविभागाने ठिकठिकाणी ट्रेसिंग कॅमेरे बसविणे, पिंजरे बसविणे तसेच २४ तास रेंजरची गस्त ठेवून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेनेचे मुरबाड विधानसभा संपर्कप्रमुख नरेंद्र शेलार यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर बदलापूरचे वनक्षेत्रपाल प्रमोद ठाकर यांच्याशी संपर्क साधला असता वनविभागाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या असल्याचे स्पष्ट केले. ज्या ठिकाणी बिबट्या आढळला होता, तो परिसर घनदाट जंगलाचा असून अनेकदा बिबट्या दिसल्याचे परिसरातील नागरिक सांगतात.

१५ दिवसांपूर्वी या परिसरात बिबट्या आढळून आल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितल्यानंतर नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत जनजागृती करण्यात आली आहे. या परिसरात हॅलोजन लाइट्स बसविण्यात आले असून वनविभागाचे पथक सातत्याने गस्त घालत आहे. त्याशिवाय, इतर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, आतापर्यंत या परिसरात बिबट्या आढळला नसल्याची माहिती ठाकर यांनी दिली.

बिबट्याने मार्ग बदलला?
बिबट्याची वास घेण्याची क्षमता प्रचंड असते. त्यामुळे तो डोंगरावर असला, तरी डोंगर पायथ्याजवळ कोंबड्या, मेंढ्या आदी खाद्य असल्यास त्याला ते समजते. तो भक्षाच्या जवळ येतो. भक्ष मिळाल्यास तो दोन ते चार दिवस त्या भागात थांबतो. नाहीतर, तो आपला मार्ग बदलतो. गेल्या १५ दिवसांपासून या भागात बिबट्या आढळून आला नसल्याने त्याने आपला मार्ग बदलला असावा, असा आमचा अंदाज असल्याचेही प्रमोद ठाकर यांनी स्पष्ट केले.

बिबट्याचा वावर वाढला
वांगणीजवळ काही महिन्यांपूर्वी मृतावस्थेत बिबट्या सापडला होता. मात्र, त्याचा मृत्यू कशामुळे झाला, हे आजही स्पष्ट झालेले नाही. तसेच बदलापूरजवळील आंबेशीव गावात बिबट्याने एका वासराची शिकार केल्याचे उघड झाल्याने या परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे.

Web Title: To whom did the leopards in the Wangani area go ?; An appeal to be vigilant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.