भिवंडीत डाइंग सायजिंगना आशीर्वाद कोणाचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 11:16 PM2019-11-17T23:16:51+5:302019-11-17T23:16:55+5:30

शहरात असलेल्या डाईंग कंपन्यांमध्ये कापडावर प्रक्रिया करण्यासाठी बॉयलरमध्ये केमिकल अ‍ॅसिड असलेल्या पाण्याचा वापर केला जातो.

Whose Blessings Dive Sizing? | भिवंडीत डाइंग सायजिंगना आशीर्वाद कोणाचा?

भिवंडीत डाइंग सायजिंगना आशीर्वाद कोणाचा?

googlenewsNext

- नितीन पंडित, भिवंडी

शहरात असलेल्या डाईंग कंपन्यांमध्ये कापडावर प्रक्रिया करण्यासाठी बॉयलरमध्ये केमिकल अ‍ॅसिड असलेल्या पाण्याचा वापर केला जातो. डाइंग कंपन्यांमध्ये तयार होणारा कार्बन डायऑक्साइड हा वायू चिमण्यांद्वारे (धुरांडी) हवेत सोडला जातो. सरकारी नियमानुसार या चिमण्यांची उंची ९० ते १२० फूट असणे आवश्यक आहे; मात्र येथील चिमण्यांची उंची फक्त ७० ते ८० फूट असल्याचे आढळून आले आहे. त्याचबरोबर कंपन्यांमध्ये असलेल्या बॉयलरमध्ये कोळसा टाकणे आवश्यक असताना काही डाइंग कंपन्या आर्थिक बचतीसाठी कोळशाऐवजी लाकूड वापरतात. लाकूड नीट जळत नसल्याने धुरातून काळे तंतू तयार होतात. हे तंतूमुळे त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. डाइंग कंपन्यांमध्ये कापडावर रंगाची प्रक्रिया करण्यासाठी रासायनिक अ‍ॅसिडचा वापर केला जातो. प्रक्रियेनंतर हे अ‍ॅसिडयुक्त गरम पाणी थेट गटार-नाल्यांमध्ये सोडले जाते. तसेच, बॉयलरचे तापमान तपासणीसाठी तज्ज्ञ बॉयलर आॅपरेटरची आवश्यकता असते. काही ठिकाणी तज्ज्ञ आॅपरेटर नसतात. हे कामही कामगार किंवा बिगारी करतात. यामुळे बॉयलरचा स्फोट होण्याच्या अनेक घटना घडून अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. आगीच्याही घटना घडल्या आहेत.

नदी-खाडीकिनारी असलेल्या डाइंग कंपन्यांचे पाणी थेट खाडी किंवा नदीत सोडले जात असल्यामुळे त्याचा त्रास किनाऱ्यावरील गावातील ग्रामस्थांना होत आहे. प्रदूषण करणाºया डाइंग कारखान्यांवर शहर परिसरात भिवंडी महापालिकेच्या पर्यावरण विभागाने ग्रामीण भागात स्थानिक ग्रामपंचायतींनी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाने कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र, आर्थिक हितसंबंधांमुळे ते त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आता नागरिक करत आहेत. डाइंग कंपन्यांमधून केमिकलमिश्रित धूर वातावरणात सोडल्याने मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण आणि केमिकलमिश्रित प्रदूषित पाणी थेट नदीपात्रात सोडल्याने जलप्रदूषणाची समस्या गंभीर होत चालली आहे. ज्याचा थेट दुष्परिणाम स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यातच येथील अनेक डाइंग कंपन्या अनधिकृत थाटल्या असल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिक नेते पुढारी तसेच शासकीय तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व ग्रामीण भागात ग्रामपंचायतींना हाताशी धरून ‘ना हरकत’ दाखल्यावर अनेक डाइंग कंपन्या उभारल्या आहेत.

त्यातच डाइंगमालक व शासकीय अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण संबंधाने या बेकायदा डाइंग कंपन्यांवर आतापर्यंत कोणतीही कारवाई होत नसल्याची बाबही समोर येत आहे. त्यामुळे प्रदूषण करणाºया या कंपन्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. मात्र, संबंधित यंत्रणांचे अधिकारी आणि कंपनीमालकांचे हितसंबंध कारवाईच्या आड येत असावेत, अशी चर्चा सुरू आहे.

भिवंडी-पारोळ रोडवरील खेमिसती प्रोसेस या डाइंग कंपनीसमोर शालेय विद्यार्थी अंकित गुप्ता (१३) शनिवारी अपघाती मृत्यू झाला. डाइंग कंपन्यांसमोर रस्त्यावरच उभ्या राहणाºया वाहनांमुळे ही दुर्घटना घडली. नदीनाका येथील जीवनज्योती हिंदी हायस्कूल आहे. या शाळेत अंकित इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत होता. शाळा सुटल्यानंतर तो मित्रांसोबत घरी पायी निघाला होता. खेमिसती डाइंगसमोर पाण्याचे टॅँकर नेहमीच उभे असतात. हे टॅँकर कंपनीला पाणीपुरवठा करतात. भिवंडीतील डाइंग आणि सायजिंगमुळे अगोदरच प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असतानाच बेकायदा पार्किंगचा गंभीर प्रश्न या घटनेनंतर समोर आला आहे. त्यामुळे शहरातील डाइंग सायजिंग कंपन्यांना नेमका आशीर्वाद तरी कुणाचा आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.

Web Title: Whose Blessings Dive Sizing?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.