ज्यांचे मुलांवर प्रेम त्यांनीच शिक्षक व्हावे : ज्येष्ठ साहित्यिका डॉ. विजया वाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 03:38 PM2018-09-10T15:38:07+5:302018-09-10T15:44:47+5:30
व्यास क्रिएशन्सच्यावतीने शिक्षक दिन ते जागतिक साक्षरता दिन या दरम्यान ज्ञानसाधकांना अभिवादन करण्यात आले.
ठाणे: शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांना प्रेम देतात तेव्हा १० पटीने ते शिक्षकांकडे परत येते. ज्यांचे मुलांवर प्रेम त्यांनीच शिक्षक व्हावे असे मत ज्येष्ठ साहित्यिका डॉ. विजया वाड यांनी ठाण्यात व्यक्त केले.
व्यास क्रिएशन्सच्यावतीने ज्ञानसाधकंना मानवंदना या कार्यक्रमाद्वारे सर्व गुरूवर्य आणि शिक्षकांना आदरांजली देण्यात आली. शुभंकरोती हॉल येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी डॉ. वाड म्हणाल्या की, वुई आर डिलींग विथ लाईफ नॉट विथ फाईल. मी शिक्षक असल्याचा अभिमान आहे. शिक्षक शाळेतच घडत असतात. तुमचा चेहरा तुमचे भविष्य नाही असे त्यंनी सांगितले. सौंदर्याचा मार्ग हृदयापासून सुरू होऊन कर्तुत्वापर्यंत पोहोचत असतो हे जेव्हा शिक्षकांना उमगते तेव्हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार मिळतो. यावेळी त्यांनी लिहीलेल्या पॉझीटिव्ह स्ट्रोक या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पितांबरीचे रविंद्र प्रभुदेसाई यांनी त्यांच्या शाळेतील आठवणी सांगितल्या. दत्तात्रय मेहेंदळे, अशोक - शुभा चिटणीस, अविनाश - नंदिनी बर्वे, सुरेंद्र दिघे, वैदेही दफ्तरदार, मीना क्षीरसागर, एकनाथ आव्हाड, पांडुरंग साळुंखे, डॉ. विजया वाड या ज्ञानसाधकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. व्यास क्रिएशन्सचे संचालक निलेश गायकवाड यांनी सुरूवातीला प्रास्ताविक केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्री. वा. नेर्लेकर, परिक्षीत प्रभुदेसाई उपस्थित होते. शेवटी योगेश जोशी यांचा आसु आणि हसू हा कार्यक्रम संपन्न झाला. ठाणे, पुणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर या भागातील सुमारे पाच हजार शिक्षकांशी व्यास क्रिएशन्स्च्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांना शुभेच्छा पत्र देऊन मानवंदना दिली. शिक्षकवृंदांनी या अनोख्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.