चौकाला नाव कोणाचे, आनंद दिघे की साई गुरुमुखदास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 07:11 PM2020-12-19T19:11:04+5:302020-12-19T19:12:29+5:30
उल्हासनगरातील नेताजी चौकाच्या नामकारणाचा घोळ
- सदानंद नाईक
उल्हासनगर : नेताजी चौकाच्या नामकारणाचे दोन प्रस्ताव महासभेत मंजूर झाल्याने चौक नामकरण बाबत शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी बैठक झाली. बैठकीला महापौर लीलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, सभागृहनेते भरत गंगोत्री, माजी उपमहापौर जया साधवानी, शिवसेना उपशहरप्रमुख व नगरसेवक अरुण अशान यांच्यासह पालिका अधिकारी आदीजन उपस्थित होते.
उल्हासनगर महापालिका महासभेत कॅम्प नं-५ येथील मुख्य नेताजी चौकाचे नामकरण शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. त्यानंतर महासभेत त्याच नेताजी चौकाला सिंधी समाजाचे संत साई गुरुमुखदास यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या प्रस्तावाला शिवसेनेने विरोध करून चौकाचे यापूर्वी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आनंद दिघे असे नामकरण झाल्याचे सांगण्यात आले. तेव्हा ज्या नामकरण प्रस्तावाला महासभेने प्रथम मंजूरी दिली. तो प्रस्ताव अधिकृत असणार असल्याची भूमिका महापालिका प्रशासन द्वारे घेण्यात आली. दरम्यान नेताजी चौकाच्या नामकारणावरून वाद होऊन माजी उपमहापौर जया साधवानी यांनी यातून तोडगा काढण्यासाठी सदर विषय थेट विधानसभेचे सभापती नाना पाटोळे यांच्याकडे नेला.
शहरातील चौकाचा नामकरण विषय असल्याने, आपसात चर्चा करून सोडविण्याचा सल्ला त्यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पाटोळे यांनी दिला. त्यानुसार शुक्रवारी स्थायी समिती सभागृहात शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. यावेळी महापौर लिलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, सभागृहनेते भगवान भालेराव, शिवसेनेचे उपशहरप्रमुख व नगरसेवक अरुण अशान, माजी उपमहापौए जया साधवानी यांच्यासह इतर पक्ष पदाधिकारी, पालिका अधिकारी उपस्थित होते. शिवसेनेकडून आनंद दिघे तर भरत गंगोत्री व जया साधवानी यांच्याकडून साई गुरुमुखदास यांच्या नावाचा आग्रह धरण्यात आला. चर्चेत नामकरणावर ठोस निर्णय न झाल्याने, अखेर महापालिका आयुक्त व लोकप्रतिनिधी योग्यवेळी निर्णय घेतील. असा निर्णय बैठकीत एकमताने घेण्यात आला.