बेकायदा बांधकामप्रकरणी भाजप आमदार गप्प का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:16 AM2021-03-04T05:16:29+5:302021-03-04T05:16:29+5:30
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामप्रकरणी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या प्रश्नावर डोंबिवलीचे ...
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामप्रकरणी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या प्रश्नावर डोंबिवलीचे भाजप आ. गप्प का, असा सवाल शिवसेनेचे राजेश कदम यांनी केला आहे. हा सवाल करताना कदम यांनी भाजप आमदारांचा नामोल्लेख टाळला आहे.
केडीएमसी हद्दीतील बेकायदा बांधकामप्रकरणी १२ आमदारांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्यापैकी ११ आमदार हे मनपा हद्दीबाहेरील असून, ते सर्व एकाच पक्षाचे आहेत. मात्र, डोंबिवलीतील भाजप आमदार याप्रकरणी प्रश्न का विचारत नाहीत. ते गप्प का राहतात, असा सवाल कदम यांनी केला आहे.
राज्यातील शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर केडीएमसीतील युतीही तुटली. महापालिकेच्या सदस्य मंडळाचा कार्यकाळ संपण्याआधी महापालिकेच्या महासभेत बेकायदा बांधकाम प्रकरणावरून भाजपाच्या तत्कालीन उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी शिवसेनेला लक्ष्य केले होते. इतकेच नाहीतर शिवसेनेचे कारवाईप्रकरणी मौन असल्याने भोईर यांनी त्यांच्या उपमहापौरपदाचा राजीनामा दिला होता. मग भाजपचे आमदार गप्प का राहतात, असा सवाल शिवसेनेकडून केला जात आहे. डोंबिवलीत चार ते आठ मजली इमारती बेकायदा उभ्या केल्या जातात. डोंबिवलीशेजारी असलेल्या अन्य महापालिकांमध्ये आमदार जाऊन बेकायदा बांधकामांप्रकरणी लक्ष वेधतात. महापालिका हद्दीत लक्ष का वेधले जात नाही, अशा सवाल कदम यांनी केला.
याप्रकरणी भाजप आ. रवींद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते अधिवेशनात असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
---------------------