सगळे काही सुरळीत होत असताना सामान्य प्रवाशाला जाच का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:25 AM2021-07-19T04:25:19+5:302021-07-19T04:25:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर काही वेळापत्रक ठरवून सामान्य प्रवाशांना रेल्वेने प्रवास करण्याची मुभा दिली ...

Why bother the common traveler when everything is going well? | सगळे काही सुरळीत होत असताना सामान्य प्रवाशाला जाच का ?

सगळे काही सुरळीत होत असताना सामान्य प्रवाशाला जाच का ?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर काही वेळापत्रक ठरवून सामान्य प्रवाशांना रेल्वेने प्रवास करण्याची मुभा दिली होती. मात्र कोरोनाची दुसरी लाट आली आणि पुन्हा सामान्यांच्या रेल्वे प्रवासावर गदा आली. मात्र हाच सर्वसामान्य प्रवासी खासगी क्षेत्रात काम करून घर चालवित आहे. त्याच्या खिशाला रस्ते प्रवास परवडणारा नाही. आता अनलॉकमध्ये सर्व काही खुले होत असताना सामान्य प्रवाशाच्या प्रवासावर निर्बंध कायम आहेत. त्यामुळे पोट भरण्यासाठी सामान्य प्रवासी खिशात दंडाची रक्कम ठेवूनच प्रवास करीत आहे.

दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाही. तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासातून कोरोना अधिक पसरू शकतो अशी भीती राज्य सरकारला आहे. त्यामुळे सामान्यांना रेल्वे प्रवासात सूट दिलेली नाही. सामान्यांना सूट दिली नसली तरी आज कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जतदरम्यान जवळपास ५० लाखांपेक्षा जास्त प्रवासी हे आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कामाला आहेत. त्यांच्यावर कुटुंबाचा बोजा आहे. कोरोनामध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, तर अनेकांना पगार कपातीचा सामना करावा लागला. अनेक कंपन्या कामगारांना वर्क फ्रॉम होमचा सल्ला देत असल्या तरी अनेक कामगारांना प्रत्यक्ष कामावर हजर राहावे लागते. रस्ते मार्गाने सरकारी बस, खासगी टॅक्सीने प्रवास करायचा म्हटला तर मुंबई गाठताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यात प्रवासाचा खर्च परवडणारा नाही. रेल्वेचा प्रवास हा स्वस्त असल्याने रेल्वे प्रवासाला सामान्यांची जास्त पसंती आहे. घरी बसले तर घर कसे चालणार, आहे ती नोकरीही हातून गेल्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह कोण करणार, असे विविध प्रश्न नोकरदार सामान्य प्रवासी वर्गास सतावत आहे. त्यांच्याकडे स्वत:चे वाहन नाही. त्यामुळे ते दंड भरू, पण पोटासाठी प्रवास करू या मन:स्थितीत आहे. टीसीने पकडले तर ५०० रुपये दंड भरावा लागले. मात्र महिनाभर घरी थांबून कसे चालेल. दंडाची रक्कम खिशात ठेवून सामान्य प्रवास कारवाईस न भीता प्रवास करीत आहेत. सुरुवातीला सामान्य प्रवाशांना प्रवासापासून रोखण्यासाठी कसून तपासणी केली जात होती. आता तपासणी ढिली पडली आहे. तिकीट तपासणी करण्यासाठी पुरेसे कर्मचारीही नाही. ८० टक्के पदे भरलेली नाहीत. उपलब्ध असलेले टीसीचे मनुष्यबळ हे ७० टक्के लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी वापरले जाते. त्यामुळे ३० टक्के कर्मचारी हा उपनगरी प्रवासी वर्गावर देखरेख ठेवणारा आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांवर नजर ठेवण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलीस यांच्या वतीने कारवाई केली जात आहे. सामान्य पोट नाही भरणार तर काय करणार, अशीही भावना दबक्या आवाजात कारवाई करणाऱ्या पोलिसांकडून व्यक्त केली जाते.

सामान्यांच्या व्यथा लक्षात घेता कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी सांगितले की, सामान्यांसाठी रेल्वे प्रवास सुरू करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. रेल्वे प्रशासनाने त्याची दखल घेऊन रेल्वेसेवा सुरू करावी. कोरोना काय केवळ सामान्य प्रवाशांमुळेच पसरतोय अशी सरकारची धारणा असल्यास ही धारणा चुकीची आहे. काही निर्बंध ठेवून प्रवाशाला मुभा दिली गेली पाहिजे.

----------------------------

भाजपकडून आंदोलनाचा इशारा

गेल्या रविवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर डोंबिवलीत आले होते. त्यांनीही सामान्य प्रवाशांना प्रवासी मुभा द्यावी. यासंदर्भात रेल्वेमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार आहे. त्यांनी या मागणीचा विचार केला नाही तर भाजपकडून आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे. अन्य राजकीय पक्षांनीही ही मागणी उचलून धरली पाहिजे, अशी अपेक्षा प्रवासी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.

--------------------------

Web Title: Why bother the common traveler when everything is going well?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.