उपचारांत चालढकल का?; कोरोना रुग्णांसंदर्भात भाजप, मनसेने विचारला जाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 12:57 AM2020-05-26T00:57:20+5:302020-05-26T00:57:26+5:30
रुग्णांना योग्य त्या सोयीसुविधा पुरवण्याची मागणी करतानाच विविध सूचना केला.
कल्याण : कोरोना रुग्णांच्या उपचारात केडीएमसीकडून चालढकलपणा केला जात असल्याने भाजप व मनसेच्या लोकप्रतिनिधींनी सोमवारी आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत जाब विचारला. यावेळी त्यांनी रुग्णांना योग्य त्या सोयीसुविधा पुरवण्याची मागणी करतानाच विविध सूचना केला. त्यावर आयुक्तांनी त्याचा नक्कीच विचार केला जाईल, असे आश्वासन दिले.
स्थायी समिती सभागृहात झालेल्या तातडीच्या बैठकीस भाजप खासदार कपिल पाटील, आमदार रवींद्र चव्हाण व गणपत गायकवाड, माजी आमदार नरेंद्र पवार, मनसेचे आमदार राजू पाटील, स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे, भाजप नगरसेवक राहुल दामले, मनसेचे पदाधिकारी राजेश कदम, कौस्तुभ देसाई आदी उपस्थित होते.
डोंबिवलीतील रुग्णाला रुग्णालयापर्यंत चालत येण्याचा सल्ला दिला गेला. त्यानंतर कल्याण पूर्वेतील संशयिताला चौथ्या मजल्यावर सरपटत खाली यावे लागले. तसेच डोंबिवलीतील कोरोना पॉझिटिव्ह गरोदर महिलेला रुग्णवाहिकेसाठी सहा तास वाट पाहावी लागली होती.
रुग्णवाहिकांची योग्य व्यवस्था होत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. त्यावर काय उपाययोजना केली आहे, असा सवाल आ. पाटील यांनी केला. त्यावर आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी सध्या ३३ रुग्णवाहिका आहेत. रुग्ण संख्या जास्त असल्याने त्या व्यस्त असताना रुग्णाचा फोन आला असेल. त्यामुळे गैरसोय झाली असावी. पण आता आरटीओच्या मदतीने १०० रुग्णवाहिका घेण्यात येणार आहेत. त्यामुळे रुग्णांची परवड होणार नाही, असे स्पष्ट केले.
‘रुग्णांची परवड होऊ देऊ नका’
आ. गायकवाड म्हणाले, ‘रुग्णांना परवडणारे उपचार हवेत. त्यांना लाखो रुपयांचे बिल पाठविले जाऊ नये. महापालिकेने अधिग्रहित केलेल्या खाजगी रुग्णालयांकडून रुग्णांची परवड होता कामा नये. योग्य उपाययोजना केल्या गेल्यास रुग्णांना दिलासा मिळू शकतो.’
च्केडीएमसी हद्दीत राहणारे, परंतु मुंबईत अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था का मुंबईत केली जात नाही, असा सवालही आ. पाटील यांनी केला. त्यावर आयुक्तांनी दीड हजार जणांची यादी तयार केली असून, त्यांची तेथे राहण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचे सांगितले.
च्कोरोना रुग्णांवर उपचार केल्यासंदर्भात महापालिका माहिती देते. मात्र, त्यातील वस्तुस्थिती वेगळीच दिसते. याबाबत रुग्णांच्या अनेक तक्रारी येत आहेत, याकडे खा. पाटील यांनी विचारणा केली.
च्आ. चव्हाण म्हणाले, रुग्णांची कोरोना चाचणी व उपचार मोफत झाले पाहिजेत. केशरी व पिवळ्या रंगांच्या रेशनकार्डधारकांना महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ दिला पाहिजे. खाजगी रुग्णालयात तो दिला जात नसेल, तर ही बाब गंभीर आहे. केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे रोगप्रतिकारक क्षमता वाढविणाºया गोळ्यांचे वाटप केले पाहिजे. आरोग्य सेवा पुरविण्यासाठी निधीची कमतरता असल्यास सदस्य त्यांचा निधी देण्यास तयार आहेत.’