सहलीला यंदाही विलंब का?; सभापती, सदस्यांनी विचारला जाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 12:26 AM2020-02-26T00:26:05+5:302020-02-26T00:26:12+5:30
मार्चमध्ये नेणार सहल, प्रशासनाची माहिती
कल्याण : केडीएमसीच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची सहल वेळेवर निघावी, यासाठी या संदर्भातील प्रस्तावाला शिक्षण समितीने तत्काळ मान्यताही दिली. परंतु, जानेवारी उलटून आता मार्चनजीक येऊन ठेपला तरी सहल निघालेली नाही. याबाबत मंगळवारच्या शिक्षण समितीच्या सभेत सभापती व सदस्यांनी जाब विचारला. त्यावर प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, मार्चच्या पहिल्या आठवड्यात सहल निघेल, अशी माहिती शिक्षण विभागाचे अधिकारी जे. जे. तडवी यांनी दिली.
केडीएमसीच्या शाळांमध्ये साधारण गरीब कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. दरवेळेस सहलीच्या आयोजनाचा घोळ प्रशासनाकडून घातला जातो. परंतु, यंदा संबंधित प्रस्ताव मंजूर होऊनही सहल काढलेली नाही. याबाबत सदस्या छाया वाघमारे, उर्मिला गोसावी व सभापती नमिता पाटील यांनी दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त केली. त्यावर लवकरच याची अंमलबजावणी केली जाईल, असे तडवी यांनी स्पष्ट केले. आता परीक्षानजीक येऊन ठेपल्या असताना मुले अभ्यास करणार की सहलीचा आनंद लुटणार, असाही सवाल यावेळी वाघमारे यांनी केला.
त्याचबरोबर मंगळवारच्या सभेत शाळेतील वर्गखोल्या विशिष्ट कालावधीसाठी भाडेतत्वावर देण्याचे आठ प्रस्ताव मान्यतेसाठी प्रशासनाकडून ठेवण्यात आले होते. त्याला मान्यता देताना सहलीच्या मुद्यासह महापौर आदर्श शिक्षक पुरस्काराचा विषय उपस्थित करण्यात आला. यंदाच्या वर्षी संबंधित पुरस्कार का देण्यात आले नाहीत, याकडे वाघमारे यांनी लक्ष वेधले. त्यावर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने नियोजन करता आले नाही.
यावर्षीचे आणि पुढील वर्षीचे पुरस्कार पुढच्या वर्षात दिले जातील, असे तडवी यांनी सांगितले. समिती दरवर्षी बदलते त्यामुळे पुरस्कारांचे आयोजनही दरवर्षी व्हावे, असे गोसावी म्हणाल्या.
मुदत संपण्यापूर्वी प्रस्ताव आणा
मंगळवारच्या सभेत वर्गखोल्या भाडेतत्वावर देण्यासंदर्भातील प्रस्ताव दाखल केले गेले होते. परंतू त्यांचा मुदतीचा कालावधी उलटून गेला होता. त्यामुळे सचिव संजय जाधव यांनी असे प्रस्ताव मुदत संपण्यापूर्वी पाठविण्यात यावेत, अशी सूचना प्रशासनाला केली. सभापती पाटील यांनीही तसे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
शिक्षण समिती सदस्यांना सभेचे वावडे
कल्याण : केडीएमसीच्या शिक्षण समितीची सभा मंगळवारी पार पडली. परंतु, सभेचे सदस्यांना वावडे असल्याची प्रचिती पुन्हा आली. ११ सदस्यांपैकी सभापतींसह केवळ पाचच सदस्य सभेला उपस्थित होते. यातील काहींनी उशिरा येण्याची परंपरा कायम ठेवल्याने गणसंख्या पूर्ततेच्या अभावी सभेला अर्धा तास उशिराने सुरुवात झाली.
केडीएमसीच्या शाळांमधील वर्गखोल्या खाजगी संस्था, शाळांना भाडेतत्वावर देण्याचे प्रस्ताव शिक्षण समितीच्या सभेत मान्यतेसाठी प्रशासनाकडून दाखल करण्यात आले होते. दुपारी तीन वाजताची सभा होती. महापालिकेचे सचिव संजय जाधव, शिक्षण विभागाचे अधिकारी जे. जे. तडवी आणि सभापती नमिता पाटील हे सभेसाठी वेळेवर दाखल झाले होते.
कालांतराने एकामागोमाग एक असे चार सदस्य सभागृहात आले. गणसंख्येची पूर्तता झाल्याने सभेला जाधव यांनी सुरुवात केली. तत्पूर्वी छाया वाघमारे यांनी सभेला दांडी मारणाºया व विलंबाने येणाºया सदस्यांच्या प्रवृत्तीवर नाराजी व्यक्त केली. जर सभेला यायला जमत नसेलतर समितीवर यायची आवश्यकता नव्हती. यात विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.