तेंव्हा उद्धव ठाकरे का नाही आले? त्या महिलेला मारहाण झालेलीच नाही- मीनाक्षी शिंदे
By जितेंद्र कालेकर | Published: April 4, 2023 09:25 PM2023-04-04T21:25:20+5:302023-04-04T21:25:27+5:30
रोशनीला पाहण्यासाठी ठाकरे ठाण्यात आले, हे महाराष्ट्राचे दुर्भाग्य असल्याची टीका माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केली.
ठाणे: रोशनी शिंदे हिला आम्ही कोणीच मारहाण केली नसून तिला केवळ समजविण्यासाठी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या गेल्या होत्या. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकाचा मृत्यू झाला होता. मात्र, त्यावेळी त्याला पाहण्यासाठी उद्धव ठाकरे बाहेर पडले नव्हते. आता रोशनी या महिलेला पाहण्यासाठी ठाकरे हे ठाण्यात आले, हे महाराष्टाचे दुर्भाग्य असल्याची टीका माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन केली.
रोशनी शिंदे मारहाण प्रकरणानंतर ठाण्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु असतांनाच या प्रकरणावर मीनाक्षी शिंदे यांच्यासह पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. तेंव्हा शिवसेनेच्या शिंदे गटातील कोणीही तिला मारहाण केली नसल्याचा दावा माजी महापौरांनी केला. त्या पुढे म्हणाल्या, जिल्हा शल्यचिकित्सक यांचा रिपोर्ट आल्यानंतरही त्या खासगी रुग्णालयात दाखल झाल्या. एखाद्या महिलेला पुढे करुन खासदार राजन विचारे जे राजकारण करीत आहेत, ते चुकीचे आहे.
फेसबुक वॉलवर काहीतरी टाकायला लावायचे, हे चुकीचे आहे. आम्ही मात्र संयम बाळगून आहोत. दोन दिवसांपूर्वी हीच महिला रस्त्यावर नाचत होती, असे तिच्याच फेसबुक पोस्टवरुन स्पष्ट होते. १ एप्रिल म्हणजे नरेंद्र मोदी यासह मुख्यमंत्र्यांना डॉक्टरेट मिळाली, त्यावरही तिने आक्षेपार्ह पोस्ट टाकणे कितपत योग्य आहे. पक्षासाठी आहुती देणाºयांच्या घरी उद्धव ठाकरे पोहचले नाहीत. परंतू, या महिलेला पहाण्यासाठी ठाकरे आले, हे आश्चर्यजनक आहे.
मुख्यमंत्री शिंदे हे आपल्या कामातून विरोधकांना उत्तर देत आहे. डॉक्टरेट डिग्री मिळाल्यानेच विरोधकांच्या पोटात दुखायला लागले आहे. परंतू, वारंवार बोलल्याने समज देणेही गरजेचे होते. तिला समजवायला गेल्यानंतर तिनेच शिवीगाळ केली. तिला कोणीही मारहाण केली नसल्याचा दावाही त्यांनी केला. हाच दावा माजी महापौर नरेश म्हस्के यांनीही यावेळी केला.