न बघता रिक्षा का वळवली? असं विचारलं म्हणून रिक्षा चालकानं दुचाकी स्वारास केली बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2023 12:16 AM2023-12-09T00:16:48+5:302023-12-09T00:17:28+5:30
काशीगावच्या ग्रीन व्हिलेज मध्ये राहणारे सचिन बर्डे ( ३४ ) हे बुधवारी दुचाकी वरून सृष्टी इस्कॉन मंदिर रस्त्यावरून दुचाकी वरून चालले होते.
मीरारोड (ठाणे ) - न बघता रिक्षा का वळवली ? अशी विचारणा केली म्हणून मस्तवाल रिक्षा चालकाने एका दुचाकीस्वारास रक्तबंबाळ व फ्रॅक्चर केल्याची घटना मीरारोड भागात घडली आहे.
काशीगावच्या ग्रीन व्हिलेज मध्ये राहणारे सचिन बर्डे ( ३४ ) हे बुधवारी दुचाकी वरून सृष्टी इस्कॉन मंदिर रस्त्यावरून दुचाकी वरून चालले होते. त्यावेळी मीरारोड कडून आलेल्या रिक्षा चालकाने सिग्नल न देताच अचानक रिक्षा वळवली. त्यावेळी समोरून येणाऱ्या बर्डे यांनी रिक्षा चालकास उजवी कडे न पाहताच कशी रिक्षा वळवली ? असा सवाल केला असता रिक्षा चालक परमेश्वर बीबीचंद चौहान ( २४ ) रा. पेणकरपाडा, दत्त मंदिर जवळ ह्याने बर्डे यांना अरेरावी करून अश्लील शिवीगाळ करू लागला.
तसेच कोणत्या तरी कडक वस्तूने बर्डे यांच्या चेहऱयावर मारून त्यांच्या डोळ्याखालील हाड फ्रॅक्चर केले , नाकातून रक्त आले. काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून रिक्षा चालक परमेश्वर ह्याला अटक केली आहे. उपनिरीक्षक एस. बी. भोसले तपास करत आहेत.