गुन्हा दाखल करू नका असे का म्हणीन? हरिजन याचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 12:45 AM2018-11-25T00:45:00+5:302018-11-25T00:45:10+5:30
मॅक्सस मॉलसमोरील ‘चाय सुटा बार’ या चहाच्या दुकानाबाहेर सोमवारी रात्री वाहतूककोंडी झाली,
मीरा रोड : वाहतूककोंडी झाल्याने गाडी पुढे घ्या, असे सांगितल्याचा राग येऊन मारहाण केल्याप्रकरणी आपण रोज गुन्हा दाखल करा, म्हणून पोलीस ठाण्यात जात आहोत. यामुळे गुन्हा दाखल करू नका, असे म्हणण्याचा प्रश्नच नसल्याचे सुरक्षारक्षक मारुती हरिजन याने म्हटले आहे. यावरून भार्इंदर पोलीसच राजकीय दबावाखाली गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचे स्पष्ट झाले आहे .
मॅक्सस मॉलसमोरील ‘चाय सुटा बार’ या चहाच्या दुकानाबाहेर सोमवारी रात्री वाहतूककोंडी झाली, म्हणून आमदार नरेंद्र मेहता यांना त्यांची गाडी पुढे घेण्यास सांगणाऱ्या हरिजन याला मेहतांनी मारहाण करत त्याची कॉलर गच्च धरून दुकानापर्यंत ओढत नेले होते. त्यामुळे त्याला श्वास घेणे अवघड झाले. मेहतांसह त्यांच्या सहायकानेही अरेरावी करत हरिजन याला मारहाण केली. तशी फिर्याद देण्यास गेलेल्या हरिजन यालाच अर्ज द्या, असे सांगून भार्इंदर पोलिसांनी बोळवण केली.
भार्इंदर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आर.के. जाधव यांनी मात्र तक्रारदारानेच गुन्हा नोंदवायचा नसल्याचे म्हटले होते, असे सांगितल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये येताच हरिजन याने मात्र आपण गुन्हा दाखल करण्यासाठी रोज पोलीस ठाण्याच्या चकरा मारत आहोत. शनिवारी सकाळीही दोन तास पोलीस ठाण्यात होतो, असे त्यांनी सांगितले.
पुरावा कुणी नष्ट केला
हरिजन यांच्या स्पष्टीकरणामुळे भार्इंदर पोलीसच गुन्हा दाखल करण्यास टोलवाटोलवी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दुसरीकडे चहाच्या दुकानचालकाने घटनेचा सीसीटीव्ही फुटेजचा पुरावा कुणाच्या दबावाखाली डिलिट केला, असा सवाल केला जात असून पुरावा नष्ट करणाºयांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओतही मेहता व त्यांच्यासोबत असलेले हे रागात बोलत असल्याचे तसेच त्यांच्यासोबतची व्यक्ती हरिजन याला मारत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.