टोलच्या रस्त्यांवर खड्डे लोकांनी का सहन करावेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 01:12 AM2019-07-15T01:12:59+5:302019-07-15T01:13:02+5:30

भिवंडीतील कशेळी-अंजूरफाटा मार्गावर मंगळवारी प्रचंड वाहतूककोंडी झाली होती.

Why do people tolerate potholes on toll roads? | टोलच्या रस्त्यांवर खड्डे लोकांनी का सहन करावेत?

टोलच्या रस्त्यांवर खड्डे लोकांनी का सहन करावेत?

Next

भिवंडीतील कशेळी-अंजूरफाटा मार्गावर मंगळवारी प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. सुमारे नऊ किलोमीटर अंतराच्या जेमतेम १५ मिनिटांच्या प्रवासाला तब्बल तीन तासांहून अधिक वेळ लागला होता. या वाहतूककोंडीचा परिणाम ठाणे शहराबरोबरच मुंबई- नाशिक प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर झाला होता. वाहतुकीचे नियमन करणारे वाहतूक पोलीस या जीवघेण्या कोंडीने हैराण झाले होते. मात्र, केवळ मंगळवारीच या मार्गावर अशी भयानक वाहतूककोंडी झाली होती, असे नाही तर या मार्गावर प्रवास करणाºया प्रवाशांच्या नशिबी ही वाहतूककोंडी रोजचीच डोकेदुखी ठरली आहे. एकाच तालुक्यात पाच टोलनाके असलेला भिवंडी तालुका जिल्ह्यातील एकमेव तालुका असावा. पाच टोलनाके असूनही या पाचही मार्गांवर नेहमीच वाहतूककोंडी असते. टोलवसुली जोरदार करूनही संबंधित टोल कंपन्या हे रस्ते सुस्थितीत ठेवण्यास अपयशी ठरत आहेत. त्यामुळे या सर्व टोल रस्त्यांची दुरवस्था झाली असून रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे या मार्गांवर नेहमीच अपघात होत असून प्रवाशांबरोबरच स्थानिक नागरिकांना आपला जीव मुठीत धरून या रस्त्यांवरून प्रवास करावा लागत आहे. मात्र, या टोल कंपन्यांवर वचक व देखरेख असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे या रस्त्यांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष होत आहे. इतर कुठल्याही ठिकाणाहून भिवंडीत दाखल व्हायचे असेल, तर टोल द्यावाच लागेल, अशी परिस्थिती आहे. ठाणे-मुंबईतून कशेळीमार्गे भिवंडीत यायचे झाले, तर या मार्गावर कशेळी येथे टोलनाका आहे. नाशिकवरून भिवंडीत दाखल व्हायचे असेल, तर पडघा येथे टोलनाका आहे. वसईमार्गे भिवंडीत यायचे झाले, तर चिंचोटी-अंजूरफाटा या मार्गावर मालोडी येथे टोलनाका आहे. वाडा येथून भिवंडीत यायचे असेल, तर भिवंडी-वाडा मार्गावर कवाड येथे टोलनाका आहे आणि कल्याणमधून भिवंडीत यायचे झाले, तर कोनगोवा टोलनाका आहे. या सर्व टोलनाक्यांवर अवजड वाहनांची नेहमीच येजा असल्याने टोल कंपन्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होत असतो. मात्र, प्रचंड आर्थिक फायदा होऊनही या टोल कंपन्यांचे रस्त्याच्या व्यवस्थापनाकडे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या रस्त्यांची दुरवस्था झाली असून रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. कशेळी-अंजूरफाटा रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचत असल्याने या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. परिणामी, या मार्गावर मोठ्या प्रमाणात कोंडी होते. गोदामपट्टा असल्याने अवजड वाहनांची रहदारी नेहमीच असते. स्थानिक नागरिक व प्रवासी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन न करता वाहतूक नियमांची पायमल्ली करीत बेशिस्तीने वाहन चालवतात. वाहतूक पोलीस आपल्या आर्थिक फायद्यासाठी काही ठिकाणांवर चौकशीच्या बहाण्याने वाहने अडवतात. त्यामुळेदेखील वाहतूककोंडी होते. अवजड वाहनांना सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत बंदी असतानाही या चार मार्गांवर अवजड वाहने राजरोसपणे येजा करत असतात. या अवजड वाहनांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलीस ठोस भूमिका बजावताना दिसत नाहीत.
कवाड टोलनाका रस्त्यावर नदीनाका ते शेलार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने खड्डे पडून कोंडी होते. मुंबई-नाशिक महामार्गावर खड्ड्यांमुळे दिवा ते मानकोली व मानकोली ते रांजनोली बायपासनाका अशी प्रचंड वाहतूक होत असते. या मार्गावरील रांजनोली बायपास येथे उड्डाणपुलाचे काम अपूर्ण असल्याने या मार्गावर नेहमीच वाहतूककोंडी होत असते. कोनगाव टोलनाका असलेल्या कल्याण-भिवंडी मार्गावरदेखील तशीच परिस्थिती आहे. ज्या रस्त्यांवर टोल आकारला जातो, ते रस्ते तरी पावसात टिकाव धरणारे असले पाहिजेत. मात्र, त्या रस्त्यांनाही खड्डे पडले आहेत. टोल वसूल करणाºया कंपन्यांची मुजोरी हा स्वतंत्र लेखनाचा विषय आहे. मात्र, राजकीय नेत्यांचे हितसंबंध थेट टोल ठेकेदारांशी जोडलेले असल्याने सर्वसामान्य प्रवासी वाहतूककोंडीत भरडले जात आहेत.
>भिवंडी तालुक्यात पाच टोलनाके असून या परिसरात गोदामे असल्याने अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने टोल कंपन्यांना मोठी कमाई आहे. मात्र, तरीही ज्या रस्त्यांवर टोल आकारला जातो, त्यापैकी एकही रस्ता धड नाही. सर्व रस्त्यांना खड्डे पडून प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. राजकीय नेत्यांचे अभय असल्याने टोल कंपन्या मुजोर झाल्या असल्याचेच हे लक्षण आहे.

Web Title: Why do people tolerate potholes on toll roads?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.