रिंग रोड हवाच कशाला?,रिपाइंचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 12:27 AM2017-12-07T00:27:44+5:302017-12-07T00:28:06+5:30
शहर विकास आराखड्यातील रिंग रोडमुळे झोपडपट्यांवर बुलडोझर फिरणार असल्याने अनेक बेघर होणार आहेत. गरीबांची घरे जाणार असतील तर रिंग रोड कशाला असा सवाल करत शिवसेना
उल्हासनगर : शहर विकास आराखड्यातील रिंग रोडमुळे झोपडपट्यांवर बुलडोझर फिरणार असल्याने अनेक बेघर होणार आहेत. गरीबांची घरे जाणार असतील तर रिंग रोड कशाला असा सवाल करत शिवसेना, काँॅग्रेस, ओमी टीम, राष्ट्रवादी, भारिप, पीआरपी व मनसेने विरोध केला आहे. त्यांच्यात सध्या बैठका सुरू आहेत.
१३ किलोमीटरच्या क्षेत्रफळाच्या शहराला रिंग रोड हवाच कशाला? असा प्रश्न रिपाइचे प्रदेश सचिव नाना पवार, प्रदेश उपाध्यक्ष महादेव सोनावणे यांनी केला. साई पक्षाचे नगरसेवक गजानन शेळके यांनी तर रिंग रोडमुळे एकूण लोकसंख्येपैकी ३० टक्के नागरिक बेघर होणार असल्याचे सांगून विरोध केला.
शहरातील ९० टक्के नगरसेवकांना शहर विकास आराखडा समजला नाही. माहिती विचारण्यास आलेल्या प्रभागातील नागरिकांना काय उत्तरे देऊ? असा प्रश्न त्यांच्या समोर पडला आहे. गुरूवारी महापौर मीना आयलानी यांनी विशेष महासभा बोलावली आहे. महासभेत शहरविकास आराखडा बनवणारी अहमदाबाद येथील सेफ्ट कंपनीचे अधिकारी आराखडा समजावून सांगणार आहेत.
उपमहापौर जीवन इदनानी यांनी तर रिंग रोड व्यतीरिक्त जुनाच शहर विकास आराखडा पुन्हा प्रसिध्द केल्याची टीका केली. जुन्या शहर विकास आराखडयातील खुली जागा, आरक्षित भूखंड, बंद पडलेल्या कंपन्यांच्या जागा यावरील ग्रीन झोनचे आरक्षण उठवण्यात आले आहे. एकूणच शहर विकास आराखडा बिल्डर धार्जिणा असल्याची टीका सर्वच पक्षाचे नगरसेवक करत आहे.
मनसेचे शहर-जिल्हाध्यक्ष प्रदीप गोडसे, संजय घुगे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाउपाध्यक्ष बंडू देशमुख, मनोज शेलार, मैनूवुद्दीन शेख यांनी पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांची भेट घेऊन आराखडा मराठीतून प्रसिध्द करण्याची मागणी केली.
रिंग रोडचा प्रश्न ऐरणीवर
भाजपाचे शहरजिल्हाध्यक्ष कुमार आयलानी, महापौर मीना आयलानी यांनी महापौर कार्यालयात बैठक बोलावली होती. आयुक्त राजेंद्र निंबाळकर हेही उपस्थित होते. बैठकीत शहरातील रस्त्यासह पाणीटंचाई व रिंग रोडबाबत चर्चा झाली. रिंग रोडमध्ये झोपडपट्टीसह बॅरेकची व ब्लॉकवरील घरे, इमारती येत असल्याचा प्रश्न व्यक्त झाला असून चर्चेनंतर सोडवण्याचे आश्वासन आयलानी व महापौरांनी दिले.
ज्योती कलानी यांची बैठक
आमदार ज्योती कलानी यांनी कलानी महल येथील निवासस्थानी ओमी टीमसह वास्तूविशारद यांची बैठक रविवारी घेतली. बैठकीत रिंग रोडबाबत चर्चा होऊन विरोध करण्याचे ठरले आहे. नवीन विकास आराखडयातील रस्त्यांमुळे आमदार ज्योती कलानी यांचे आमदार निवासही बाधित होणार आहे. तसेच रिंग रोड त्यांच्या बंगल्याच्या मागील झोपडपट्टीतून जात असल्याने, परांपरागत मतदार नाराज होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.