भय इथले का संपत नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 12:04 AM2019-12-30T00:04:49+5:302019-12-30T00:05:10+5:30

भिवंडीत वारंवार बलात्कार, हत्येच्या घटना घडत असल्याने हा भाग बदनाम झाला आहे.

Why doesn't fear end here! | भय इथले का संपत नाही!

भय इथले का संपत नाही!

Next

- नितीन पंडित, भिवंडी

भिवंडीत वारंवार बलात्कार, हत्येच्या घटना घडत असल्याने हा भाग बदनाम झाला आहे. बलात्कारासारख्या घटना घडल्या की, त्यासाठी सर्वच जण पोलिसांना दोष देत सुटतात. यातूनच राजकीय कुरघोडीलाही ऊत येतो. मात्र, महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलीस, शासकीय यंत्रणेसोबतच नागरिक म्हणून आपलीही आहे. बलात्काऱ्यांना कायद्याच्या चौकटीतूनच कठोर शिक्षा झाली पाहिजे. हैदराबादमधील घटनेतील आरोपींचे पोलिसांनी एन्काउंटर केले म्हणून आता देशात अशा घटना घडणारच नाहीत, असे समजणे भाबडेपणाचे आहे.

बलात्कार हे विकृतीच्या रोगाचे महाभयंकर लक्षण आहे. त्या लक्षणाचा इलाज करून या रोगाचे मूळ नष्ट केले पाहिजे, असे महिला सक्षमीकरण चळवळीतील कार्यकर्त्या वारंवार याकडे लक्ष वेधतात. सरकारने या कार्यकर्त्यांच्या सूचना गांभीर्याने घ्यायला हव्यात. तसेच, बलात्काऱ्यांना शिक्षा देण्यासाठी देशातील कायद्यांत सुधारणा होते; मात्र अंमलबजावणीच्या नावाने बोंबच आहे. नशाखोरी, बेरोजगारी, अशिक्षितपणा आणि त्याला मिळणारी व्यसनाधीनतेची जोड यामुळे समाज विकृतीच्या खाईत लोटला जात आहे. त्यातूनच बलात्कारासारखी कीड सामाजिक व्यवस्था पोखरत आहे. त्यामुळे या समस्यांवर उपाय करतानाच समाजाचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. तरच, अशा घटना कमी होतील.

बलात्काराची विकृती ही असहाय स्त्रीला पाहून अचानक उफाळून येते. काही वेळेस तो ठरवूनही होतो. मात्र, काही क्षणांत केलेली कृतीची गंभीरता हे दुष्कृत्य करणाºयाच्या उशिरा लक्षात येते. आता आपल्याला कठोर शिक्षा होईल, या भीतीतून पुरावा नष्ट करण्यासाठी पीडितेची हत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले जाते. हैदराबाद आणि भिवंडीतील घटनेतही हाच प्रकार घडला.
भिवंडीत ज्या मुलीची बलात्कार करून हत्या झाली, तिच्या वडिलांच्या घरी आरोपींची वाईट नजर होती. खाऊचे आमिष दाखवून या बालिकेला बाजूला नेऊन तिच्याशी अमानुष कृत्य करून तिच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. या आरोपींना फाशीचीच शिक्षा करावी, यासाठी मागणी होत आहे. मात्र, निष्पाप मुलीचा जीव गेला त्याचे काय? तिच्या आईवडिलांचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. भिवंडीसारख्या शहरात सातत्याने अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांनी या गुन्ह्यांचा छडा लावून गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्याची मागणी सातत्याने पालकांकडून केली जात आहे.

हैदराबाद येथील दिशा बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर देशभर संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणातील आरोपींचे पोलिसांनी एन्काउंटर केले. त्याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या असल्या तरी एकूणच सूर पीडितेला न्याय मिळाल्याचा होता. अशा घटना थांबतील अशी त्यामागे भावना होती. मात्र, ही घटना ताजी असतानाच सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या होऊ न भिवंडी हादरली. जोपर्यंत स्त्री फक्त उपभोगाची वस्तू नाही, ही भावना समाजात निर्माण होत नाही, तोपर्यंत या घटनांना आळा बसणे शक्य होणार नाही. त्यासाठी शालेय अभ्यासक्र मातही हा विषय येणे गरजेचे आहे. विशेषत: कायद्याची कठोरता व महिलांच्या सुरक्षिततेबाबत शासनाने घेतलेले निर्णय हे समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि त्यासंदर्भात जनजागृती करणे गरजेचे आहे, त्याशिवाय इथले भय संपणार नाही.

Web Title: Why doesn't fear end here!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.