चित्रपटासाठी आवाज देणारे राज ठाकरे गप्प का? जितेंद्र आव्हाडांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 11:00 PM2022-11-12T23:00:10+5:302022-11-12T23:01:38+5:30
ज्यांचा या चित्रपटात आवाज आहे, त्यांना स्क्रीप्ट माहित नसेल का? त्यांचे हृदय दुखावले नसले का?
ठाणे - आम्ही केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत दाखिवण्यात आलेल्या चुकीच्या विकृतीला विरोध केला होता म्हणूनच आमच्यावर कायद्याचा कोणत्याही प्रकारचा आधार न घेता, चुकीचे कलम लावून आम्हाला अटक केली. आम्ही कायदा कसाही मोडतोड करु शकतो, फेकू शकतो हे उदाहरण सेट करण्यासाठीच, महाराष्ट्राला दाखविण्यासाठी ही अटक करण्यात आल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. तसेच, या चित्रपटासाठी आवाज देणाऱ्या मनसेप्रमुखराज ठाकरेंनाही आव्हाडांनी लक्ष्य केलं.
ज्यांचा या चित्रपटात आवाज आहे, त्यांना स्क्रीप्ट माहित नसेल का? त्यांचे हृदय दुखावले नसले का? त्यात एवढे विकृतीकरण होत असतांना राज ठाकरे यावर काहीच बोलत का नाही? असा सवाल त्यांनी केला. ते खुप हुशार आहेत, त्यामुळे त्यांनी अशा चित्रपटांना थांबविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही माफी मागावी, तुमचा चित्रपटातील आवाज मागे घ्यावा, असे मी सांगणार नाही, मात्र, एखादी चुकीची गोष्ट तुमच्या डोळ्यासमोर होत असेल तर याला कुठेतरी विरोध झालाच पाहिजे असेही आव्हाड यांनी म्हटले.
आम्ही विरोध करणारच
पोलिसांचा काहीही संबंध नव्हता, त्यांच्यावर केवळ दबाव होता, म्हणूनच त्यांच्याकडून ही कारवाई करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण होत असेल तर त्याला आम्ही विरोध करणार आणि त्यासाठी आम्हाला ३६५ दिवस जरी जेल मध्ये टाकले तरी त्याचे आम्ही स्वागत करु असे आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगत एक प्रकारे आव्हान दिले. त्यामुळे तुम्ही जेल काय फाशी दिली तरी चालेल असेही त्यांनी सांगितले.
कायदा मोडून अटक केली - आव्हाड
विवियाना मॉल मधील हरहर महादेव चित्रपटाच्या वेळेस मारहाण प्रकरणी आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. त्यांची शनिवारी जामीनावर सुटका करण्यात आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलतांना हा आरोप केला. कलम ४१ (ए) अन्वये पहिली नोटीस आल्यानंतर सांयकाळी 5 वाजेर्पयत चौकशीला हजर राहावे असे सांगण्यात आले होते. मात्र दोन वाजता नोटीस दिल्यानंतर अडीच वाजता अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. वास्तविक पाहता, अटक करण्यापूर्वी नियमानुसार ७२ तासाची संधी देणो अपेक्षित होते. त्यावेळेस माङो म्हणने मांडता आले असते, मात्र तसे न करता केवळ दबावापोटी अटक करण्यात आल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. त्यात शुक्रवारी अटक झाल्यानंतर कोर्टात हजर करता आले असते मात्र सांयकाळ र्पयत वेळ काढण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. केवळ जेलमध्ये कसे ठेवता येईल याची तजवीज करण्यात आली होती, असेही त्यांनी सांगितले.