उल्हासनगरात १७ कोटीच्या निधीतून साहित्य खरेदीचा घाट कशासाठी?. विरोधकांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 03:33 PM2020-08-13T15:33:57+5:302020-08-13T15:34:52+5:30
शहरात कोरोना रुग्ण कमी झाल्याने महापालिकेने उभारलेल्या कोरोना सेंटर व कोविड रूग्णालयातील बेड रिकामे आहेत.
सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरात कोरोना रुग्ण कमी होऊन महापालिकेने उभारलेले केअर सेंटर व कोविड रूग्णालयातील असंख्य बेड रिकामे असताना १७ कोटीच्या निधीतून साहित्य खरेदीचा घाट कोणासाठी व कशासाठी?. असा प्रश्न विरोधकांनी करून महापालिका कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले. तर शासन नियमानुसार रुग्णालय उभारणे व साहित्य खरेदी केली जात असल्याची माहिती आयुक्तांच्या वतीने जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांनी दिली आहे.
उल्हासनगर महापालिका कारभारावर मनसेने आक्रमक भूमिका घेतली असून त्या पाठोपाठ भाजपा नगरसेवकांनी आघाडी घेतली आहे. साई प्लॅटीनियम रुग्णालयाच्या अनागोंदी कारभारावर भाजपचे जिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वाणी, आमदार कुमार आयलानी, नगरसेवक मनोज लासी, प्रदीप रामचंदानी, महेश सुखरामनी आदींनी अारोप प्रत्यारोप करून चौकशीची मागणी केली. त्यापाठोपाठ महापालिकेने १७ कोटीच्या निधीतून कोरोना रुग्णालय तसेच रुग्ण, डॉक्टर, कर्मचारी आदी साठी लागणारे साहित्य व औषधेसाठी निविदा काढली. यामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप त्यांनी केला. एकुनच महापालिका व आयुक्त डॉ राजा दयानिधी यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. तर दुसरीकडे महापालिका व आयुक्तांच्या कारभारावर महापौर लीलाबाई अशान, सभागृह नेते राजेंद्र चौधरी, शिवसेना उपशहर प्रमुख व नगरसेवक अरुण अशान यांनी पाठिंबा दर्शवित विश्वास व्यक्त केला आहे.
महापालिका हद्दीत कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी झाले असलेतरी, भविष्याचा विचार करून व शासन नियमानुसार शहराबाहेर ताबोर आश्रम येथे ४०० बेडचे रुग्णालय व डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, नर्स, कोरोना रुग्णासाठी विविध साहित्य व औषध खरेदीसाठी १७ कोटीच्या निधीतून महापालिकेने निविदा काढली आहे. फक्त निविदा काढली असताना विरोधकांनी यामध्ये भ्रष्टाचार झाला. असा आरोप करणे चुकीचा असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी युवराज भदाने यांनी दिली. तसेच शासन नियमानुसार साहित्य खरेदीची निविदा काढल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एकूणच आरोप प्रत्यारोपाणे शहरातील वातावरण ढवळून निघाले असून महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांना अप्रत्यक्ष टार्गेट करण्यात येत असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
१७ कोटीच्या निधीतून अत्याधुनिक रुग्णालय उभारा - आमदार कुमार आयलानी
शहरात कोरोना रुग्ण कमी झाल्याने महापालिकेने उभारलेल्या कोरोना सेंटर व कोविड रूग्णालयातील बेड रिकामे आहेत. अशावेळी तब्बल १७ कोटीच्या निधीतून आरोग्य साहित्य व औषध खरेदी करण्या ऐवजी त्या निधीतून महापालिकेने स्वतःचे अत्याधुनिक रुग्णालय उभारावे. असा सल्ला आमदार कुमार आयलानी यांनी महापालिका आुक्तांनी आयुक्तांनी दिला आहे.