पदपथ अडवणाऱ्या दुकानदारांना अभय का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:51 PM2020-02-24T23:51:45+5:302020-02-24T23:51:54+5:30
केडीएमसीचे अतिक्रमणाकडे दुर्लक्ष; नागरिकांवर रस्त्यावरून चालण्याची वेळ
कल्याण : केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या दणक्यानंतर एकीकडे फेरीवाला अतिक्रमणाविरोधातील कारवाई जोमात सुरू असलीतरी पदथावरील अतिक्रमण हटविण्याकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे चित्र कल्याण-डोंबिवलीत पाहायला मिळत आहे. फेरीवाला हटविण्याकडे लक्ष केंद्रीत झाले असताना दुकानदारांनी पदपथावर थाटलेल्या जादा सामानांना अभय का? असा सवाल उपस्थित होत आहे.
डोंबिवली रेल्वेस्थानकाला लागून असलेल्या स्कायवॉकवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याप्रकरणी सूर्यवंशी यांनी दोन अधिकाऱ्यांसह एका कर्मचाºयाला निलंबित केले आहे. आयुक्तांच्या या कारवाईनंतर फेरीवाल्यांविरोधातील कारवाईला वेग घेतल्याचे चित्र कल्याण-डोंबिवलीत दिसत आहे. मात्र, पदपथावरील अतिक्रमणांवर प्रभावीपणे कारवाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
शहरातील रस्त्याच्या लगतच्या बहुतांश पदपथावर अतिक्रमण झाले असल्याचे निदर्शनास पडल्याने सूर्यवंशी यांनी सर्व प्रभाग अधिकाºयांना पदपथावरील अतिक्रमणे सात दिवसांत हटवण्याबाबत संबंधित दुकानदारांना नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच जे दुकानदार पदपथावरील अतिक्रमणे हटविणार नाहीत, ती बळाचा वापर करून काढावीत व त्याच्या तोडफोडीचा खर्च त्यांच्याकडूनच वसूल करावा, असे निर्देशही आयुक्तांनी शनिवारी दिले आहेत. मात्र, त्यानंतरही अशी अतिक्रमणे हटविण्यासंदर्भात प्रभावीपणे कारवाई सुरू झालेली नाही. कल्याण-डोंबिवलीतील रेल्वेस्थानक परिसरातील अनेक दुकानदार आजही आपले जादा सामान ठेवून पदपथ अडवत आहेत. त्यामुळे पादचाºयांना पदपथाऐवजी रस्त्यांवरूनच चालणे भाग पडत आहे.
महमदअली चौक ते कल्याण रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता असो अथवा डोंबिवली पूर्वेकडील उर्सेकरवाडी, डॉ राथ रोड येथे ही परिस्थिती रविवारी आणि सोमवारी प्रामुख्याने दिसून आली. उर्सेकरवाडीतील भाजी मंडईला तर शॉपिंग सेंटरचे स्वरूप आल्याचेही पाहायला मिळत आहे.
‘ते’ पुतळेही हटवा
फेरीवाला अतिक्रमणाविरोधात महापालिका प्रशासन आक्रमक झाल्याने फेरीवाल्यांमध्ये रोषाचे वातावरण असताना व्यापाºयांना अभय का? असा सवाल फेरीवाला संघटनांकडून केला जात आहे. बिनदिक्कतपणे पदपथावर थाटलेले दुकानातील जादा सामान तसेच कपड्यांच्या जाहिरातींसाठी उभे केलेले पुतळे पथकांना दिसत नाहीत का? याकडे संघटनांनी लक्ष वेधले आहे. त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे.