कार्यकर्त्यांना कंडोमसारखे का वापरता?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 07:10 AM2023-01-09T07:10:59+5:302023-01-09T07:11:13+5:30

शिवसेना-भाजप युती तीन दशके होती. या युतीला दोनवेळा सत्ता प्राप्त झाली. परंतु तरीही युतीत आपण सडलो, अशी दोन्ही पक्षांच्या काही नेत्यांची भावना झाली.

Why use activists like condoms? | कार्यकर्त्यांना कंडोमसारखे का वापरता?

कार्यकर्त्यांना कंडोमसारखे का वापरता?

googlenewsNext

- संदीप प्रधान

राज्यातील बाळासाहेबांची शिवसेना व भाजप यांचे सरकार नागपूरमध्ये विरोधकांच्या आरोपांचा सामना करीत होते. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोपांच्या फैरी झडू लागल्या, तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छातीचा कोट करून उभे राहिले आणि त्यांनी विरोधकांचे वार आपल्या छातीवर झेलले. रोखठोक उत्तरे दिली. विरोधकांचे टीकास्त्र निष्प्रभ करण्याचा प्राणपणाने प्रयत्न केला. त्याचवेळी ठाण्यातील कशिश पार्क या मराठमोळ्या, उच्च मध्यमवर्गीयांच्या वस्तीत भाजपचे पदाधिकारी प्रशांत जाधव यांना पक्षाचा फलक लावण्याच्या वादातून मारहाण झाली. त्यांचे डोके फुटले. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना इस्पितळात दाखल केले. 

जाधव यांनी आपल्या तक्रारीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले आदी १० ते १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. जाधव यांच्यावरही विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. नागपूरमधील चित्राच्या विसंगत चित्र ठाण्यात दिसत होते. 
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून ‘उठाव’ करून शिंदे व त्यांच्या साथीदारांनी वेगळा पक्ष स्थापन केला. सरकारवर मांड ठोकली. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांचा संघर्ष चुकीचा असला तरी नैसर्गिक मानता येईल. परंतु भाजप व बाळासाहेबांची शिवसेना हे आता मित्रपक्ष आहेत. ठाकरे यांच्या शिवसेनेला निवडणुकीत पराभूत करण्याकरिता उभय पक्षांना येणाऱ्या महापालिका, विधानसभा व लोकसभा निवडणुकीत परस्परपूरक राजकारण करायचे आहे. 

शिवसेना-भाजप युती तीन दशके होती. या युतीला दोनवेळा सत्ता प्राप्त झाली. परंतु तरीही युतीत आपण सडलो, अशी दोन्ही पक्षांच्या काही नेत्यांची भावना झाली. त्यातून ही युती फुटली.  महाराष्ट्राची जनता सरसकट एकाच पक्षाला कौल देत नाही. त्यामुळे युती, आघाडी ही अपरिहार्यता आहे. काँग्रेसमधून फुटून राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाली. दोन्ही काँग्रेसने पंधरा वर्षे सत्ता उपभोगली. मागील पाच वर्षांत शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता राबवली. परंतु गावागावात दोन्ही काँग्रेसमधील संघर्षाचे आविष्कार पाहायला मिळतात. 

ठाण्यात शिंदे यांचा वरचष्मा आहे. त्यांच्या नेत्यांचे काही गड आहेत. ठाकरेंच्या खांद्यावर उभी राहिलेली भाजप डोक्यावर बसू लागली, तेव्हा ठाकरेंनी तिला झिडकारले. कशिश पार्क हा शिंदेंचा गड असेल तर तेथेच घुसखोरी करण्याची घाई भाजपला व्हावी, हे आततायीपणाचे आहे. त्याचबरोबर मित्र पक्षाचा फलक देखील लावू देणार नाही, ही बाळासाहेबांच्या शिवसेनेची भूमिका सुईच्या अग्रावर राहील एवढीही हस्तिनापूरची जमीन देणार नाही, असे म्हणणाऱ्या दुर्योधनापेक्षा वेगळी नाही. प्रशांत जाधव आणि या हल्ल्याकरिता पोलिसांनी अटक केलेले अमरिक राजभर यांना त्यांच्यावरील खटले आयुष्यभर लढत रहावे लागणार.

महापालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यावर शिंदे-फडणवीस एकमेकांना पेढे भरविणार. इतकेच कशाला निरंजन डावखरे व विकास रेपाळे हेही हातात हात घालून महापालिकेची सत्ता राबवतील. जाधव-राजभर हे एकमेकांवर गुरगुरत राहतील. त्यांचे कुटुंबीय सतत दडपणाखाली राहतील. डोंबिवलीतील भाजप कार्यकर्ते मनोज कटके व कृष्णा परुळेकर यांच्यावर यापूर्वी हल्ले झाले; पण आरोपी मिळाले नाहीत. सत्ता, पैसा हा नेत्यांकरिता इतका जीव की प्राण असतो की, जाधव, कटके, परुळेकर अशा शेकडोंचे जीव त्यांना त्यापुढे कस्पटासमान वाटतात. मूर्ख कार्यकर्त्यांनी शहाणे होणे गरजचे आहे.

Web Title: Why use activists like condoms?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.