नगरसेवक बैठकीला का गैरहजर राहिले?; नरेश म्हस्के यांचा राष्ट्रवादीला थेट सवाल
By अजित मांडके | Published: February 4, 2023 03:16 PM2023-02-04T15:16:57+5:302023-02-04T15:17:04+5:30
ठाण्यात मागील काही दिवसापासून राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाणार असे चित्र निर्माण झाले आहे.
ठाणे : मुंबईत ठाण्यातील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांची बैठक अजित पवार यांनी घेतली होती. मात्र या बैठकीला सुमारे १३ माजी नगरसेवक गैरहजर राहिल्याचे दिसून आले. यावरुन बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने यावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. जो धुर येत आहे, म्हणजे कुठे तरी आग लागलेली आहे. ती आग का लागली ती लागणार आहे की नाही? याचे उत्तर जितेंद्र आव्हाड यांनी द्यावे. नगरसेवक बैठकीला गेले नाहीत, याचे कारण शोधा असा टोला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी लगावला आहे.
ठाण्यात मागील काही दिवसापासून राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाणार असे चित्र निर्माण झाले आहे. तर त्यासाठी अमिष देखील दाखविले जात आहे. परंतु अशा कोणत्याही अमिषाला बळी पडू नका, तुमची फसवणुक केली जाऊ शकते. पुन्हा चांगले दिवस येणार आहात, थोडे दिवस थांबा, पक्ष संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करा असा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ठाण्यातील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांना दिला. मात्र ज्यांच्यासाठी ही बैठक लावली होती. ते हणमंत जगदाळे, राजण किणो त्यांची पत्नी भाऊ आदींसह सुमारे १३ माजी नगरसेवक बैठकीला गैरहजर राहिल्याचे दिसून आले. त्यामुळे ते आता काय निर्णय घेतात, त्यांची मनधरणी राष्ट्रवादीचे श्रेष्ठी करणार का? अशी चर्चा सुरु आहे. असे असतांनाच आता नरेश म्हस्के यांनी त्यावर चांगलेच तोंडसुख घेतले आहेत.
अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला १३ नगरसेवक का गैरहजर राहिले याचे उत्तर आव्हाडांनी द्यावे असे त्यांनी सांगितले. नगरसेवकांची नाराजी नेमकी कोणावर हे आता स्पष्ट दिसत आहे. जो धुर येत आहे, म्हणजेच कुठेतरी आग लागलेली आहे. ती आग का लागली याचे उत्तर त्यांनी द्यावे. नगरसेवक का गैरहजर राहिले, याची कारणो शोधो असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.