मार्चअखेर ठाण्यात सुरू होणार वायफाय
By Admin | Published: February 1, 2016 01:19 AM2016-02-01T01:19:33+5:302016-02-01T01:19:33+5:30
इंटरनेटच्या युगात आता ठाण्यातील प्रत्येक नागरिकाला वायफायने कनेक्ट करण्यासाठी ठाणे महापालिकेने पावले उचलली असून शहर वायफायने कनेक्ट करण्याचा निर्णय घेतला आहे
ठाणे : इंटरनेटच्या युगात आता ठाण्यातील प्रत्येक नागरिकाला वायफायने कनेक्ट करण्यासाठी ठाणे महापालिकेने पावले उचलली असून शहर वायफायने कनेक्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणेकरांना ही सुविधा पुरविण्यासाठी ११ हून अधिक बड्या नामांकित कंपन्यांनी सहभागासाठी पालिकेकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यानुसार, येत्या महिनाभरात आॅनलाइन निविदांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मार्चअखेर ठाणेकरांना पहिल्या टप्प्यातील वायफाय सेवा मोफत वापरण्याची संधी मिळणार आहे.
नोव्हेंबर महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहतूक पोलिसांच्या एका कार्यक्रमात ठाणे शहर येत्या सहा महिन्यांत वायफायने कनेक्ट करण्याबरोबरच शहरात १५०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने महापालिकेने यापूर्वीच त्याची तयारी केली असून आता हा प्रकल्प प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार, वायफायची यंत्रणा बसविण्यासाठी महापालिका ३२ हजार ५०० विद्युत पोलचा वापर करणार आहे. याच पोलवर पहिल्या टप्प्यात ४०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. दरम्यान, वायफाय सिस्टीममध्ये ठाणे महापालिकेला एकही पैसा खर्च करावा लागणार नसून महापालिका संबंधित एजन्सीला विद्युत पोल उपलब्ध होणार आहे.