दोन मृत्यू दाखल्याने पत्नी वारसा हक्कापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 03:01 AM2020-12-03T03:01:49+5:302020-12-03T03:01:55+5:30
मलंगगडाजवळ असलेल्या कुशिवली गावात राहणारे मंगल जानू चिडा लग्नानंतर काही वर्षांनी दहिवली ग्रामपंचायत हद्दीतील सावरोली येथील आपल्या सासुरवाडीला येऊन स्थायिक झाले.
बदलापूर : एकाच व्यक्तीचा एकाच तालुक्यात दोन ग्रामपंचायतींमध्ये वेगवेगळ्या वेळी मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. दोन्ही ठिकाणी मृत्यूची नोंद झाल्यामुळे मृत व्यक्तीची पत्नी वारसा हक्कापासून वंचित राहिल्याची घटना समोर आली आहे. पतीच्या निधनाची दोन ठिकाणी नोंद झाल्याने अंबरनाथ तालुक्यातील ही आदिवासी महिला आपल्याला वारसा हक्क मिळावा, यासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे. हक्क नोंदीपासून तब्बल एक तप वंचित राहिली आहे.
मलंगगडाजवळ असलेल्या कुशिवली गावात राहणारे मंगल जानू चिडा लग्नानंतर काही वर्षांनी दहिवली ग्रामपंचायत हद्दीतील सावरोली येथील आपल्या सासुरवाडीला येऊन स्थायिक झाले. मंगल चिडा यांचे भाऊबंद मात्र कुशिवली गावात आहेत. त्यांची वडिलोपार्जित काही एकर जमीन कुशिवली गावात आहे. मंगल यांचे २७ मे २००८ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूूची नोंद अंबरनाथ तालुक्यातील दहिवली ग्रामपंचायतीत करण्यात आली आहे. पतीच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीमधील वाटा कायद्याने पत्नी आणि मुलीला मिळणे अपेक्षित आहे. त्याप्रमाणे त्या संपत्तीमध्ये वाटा मिळण्यासाठी सातबारा उताऱ्यावर त्यांच्या नावांची नोंद होणे गरजेचे आहे.
मंगीबाई मंगल चिडा असे पत्नीचे नाव आहे. तहसील कार्यालयात त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांचे पती मंगल यांचे २७ मे २००८ रोजी निधन झाले असून त्यांच्या मृत्यूूची नोंद अंबरनाथ तालुक्यातील दहिवली ग्रामपंचायतीत झाली आहे. प्रतिज्ञापत्रासोबत त्यांनी तो दाखलाही जोडला आहे. मात्र, संबंधित तलाठ्यांनी या प्रकरणी चौकशी केली असता याच तालुक्यातील श्री मलंगपट्ट्यातील कुशिवली ग्रामपंचायत हद्दीत याच व्यक्तीच्या नावे आणखी एक मृत्यू दाखला असल्याचे आढळले. त्या दाखल्यावरील मृत्यूची तारीख मात्र ३ एप्रिल २००८ अशी आहे. मंगल यांच्या मृत्यूच्या दोन ठिकाणी वेगवेगळ्या नोंदी आढळल्याने पत्नी मंगीबाई आणि मुलगी मीना बांगारे यांची वारसा हक्क नोंद रखडली आहे. एकुलत्या एक मुलीचे लग्न झाले आहे. माझा वारसा हक्क नोंद होऊन मला माझा हिस्सा मिळाला पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली .
‘त्या’ व्यक्तीचा मृत्यू झाला हे निश्चित असल्याने त्यांचा वारस तपासून वारसदार महिला आणि त्यांच्या मुलीचे नाव वारस नोंद करण्यात कोणतीही अडचण दिसत नाही. संबंधित विभागाला त्यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. - जयराज देशमुख, तहसीलदार