शहीद मेजर कौस्तुभ राणेंच्या पत्नी कनिका सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2020 11:32 PM2020-11-22T23:32:56+5:302020-11-22T23:36:04+5:30
वीरपत्नीच्या देशसेवेची तळमळ आणि त्यागाबद्दल नागरिकांमधून अभिमान व्यक्त
मीरारोड - मीरारोडचे सुपुत्र शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नी कनिका राणे भारतीय सैन्यदलात शनिवारी लेफ्टनंट म्हणून दाखल झाल्या आहे . पतीच्या निधना नंतर कनिका ह्यांनी सैन्य दलात रुजू होऊन देशसेवेचे व्रत पुढे कायम ठेवण्याचा निर्धार केला होता. या वीरपत्नीच्या देशसेवेची तळमळ आणि त्यागाबद्दल नागरिकांमधून अभिमान व्यक्त होत आहे.
मीरारोडच्या शीतल नगरमध्ये राहणारे मेजर कौस्तुभ राणे ऑगस्ट २०१८ मध्ये पाकिस्तान सीमेवर काश्मीरच्या गुरेझ सेक्टर भागात दहशतवाद्यांशी लढताना शहिद झाले होते. त्यावेळी मेजर कौस्तुभ यांचे वडील प्रकाशकुमार, आई ज्योती, पत्नी कनिका, बहीण कार्तिकी यांनी साश्रू नयनांनी पण मोठ्या अभिमानाने कौस्तुभला निरोप दिला होता. गेल्या वर्षी ३ वर्षांचा मुलगा अगस्त्य लहान असून देखील कनिका ह्यांनी सैन्य दलात जाण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमध्ये ११ महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी त्यांची निवड झाली होती.
माझ्या मुलाने मला सैनिकाच्या गणवेशात बघावं. मी देशासाठी काय करतो, हे माझ्या मुलाला कळावे, असे कौस्तुभ यांना वाटायचं. आता ते नाहीत. पण मी ही माझ्या मुलाला सैन्य दलाच्या गणवेशात दिसेल, तेव्हा त्याला कळेल, आपला बाबा काय होता, आपली आईही देशासाठी काही तरी करते आहे, हे त्याला समजेल अश्या भावना त्यावेळी कनिका राणे यांनी व्यक्त केल्या होत्या . ११ महिन्यांचे खडतर सैनिकी प्रशिक्षण पूर्ण करून कनिका ह्या आता सैन्य दलात लेफ्टनंट पदावर नियुक्त झाल्या आहेत .