पतीशी अनैतिक संबंधामुळे पत्नीकडून महिलेची हत्या; नव्या घरातच घडली घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 11:42 AM2022-03-17T11:42:46+5:302022-03-17T11:43:01+5:30
लोकमान्यनगर भागात मनीषा ही तिच्या तीन मुलांसोबत वास्तव्यास होती.
ठाणे: पतीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून गीता यादव (३६) या महिलेने मनीषा पांडे (३०) हिच्या अंगावर उकळते तूप ओतून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी लोकमान्यनगर भागात हा प्रकार घडला होता. उपचारादरम्यान ६ मार्च रोजी मनीषाचा मृत्यू झाल्याने तिची आई मीरा खिरदेकर यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे वर्तकनगर पोलिसांनी मंगळवारी खुनाचा गुन्हा दाखल केला.
लोकमान्यनगर भागात मनीषा ही तिच्या तीन मुलांसोबत वास्तव्यास होती. तर ज्ञानेश्वरनगर भागात गीता वास्तव्याला आहे. पतीचे मनीषासोबत अनैतिक संबंध असल्याचा गीताला संशय होता. त्यामुळे त्यांच्यात वाद सुरू होते. मनीषा ही कामानिमित्ताने २३ जानेवारी २०२२ रोजी तिच्या माहेरी गेली होती. त्याचवेळी अचानक गीताने मनीषाला जेवण बनविण्यासाठी घरी येत असल्याचे सांगितले. त्यामुळे मनीषा तिच्या लोकमान्यनगर येथील घरी पोहचली.
घरात जेवण बनवित असताना गीताने उकळते तूप तिच्या अंगावर ओतले. यात ती गंभीर जखमी झाली. तिला लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. गीताला अटक केली नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांनी सांगितले.
नव्या घरातच घडली घटना-
पतीशी वाद झाल्याने गीता ही तिच्या माहेरी वास्तव्याला होती. या घटनेच्या आठ दिवस आधीच लोकमान्यनगर येथे तिने स्वतंत्रपणे भाड्याने खोली घेतली होती. त्याच घरात हा प्रकार घडल्याची माहिती सूत्रांनी दिली.