अभिनय कट्ट्यावर 'बायकोच्या नवऱ्याच्या बायकोचा खून, विनोदी एकांकिकेने उडवली धम्माल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 05:49 PM2019-04-01T17:49:41+5:302019-04-01T17:54:48+5:30
अभिनय कट्ट्यावर 'बायकोच्या नवऱ्याच्या बायकोचा खून या विनोदी एकांकिकेने धम्माल उडवली.
ठाणे : 'बायकोच्या नवऱ्याच्या बायकोचा खून' म्हणजे काही खतरनाक, भयानक, दुःखद, रहस्यमय असं काही नाही तर फक्त धम्माल धम्माल आणि फक्त धम्माल. विश्वविक्रमी ४२२ कट्ट्याच्या प्रवासात हजारो कलाकृती हजारो पात्र रंगवली गेली.अभिनय कट्ट्यावर आजवर अनेक रहस्यमय,विनोदी,गंभीर,ऐतिहासिक ,सामाजिक एकांकिका सादर झाल्या.अभिनय कट्टा क्रमांक ४२२ सुद्धा विनोदाच्या फिल्मी रंगामंध्ये रंगला खून झाला पण तो का झाला ? कसा झाला ? कुणी केला ? ह्याच उत्तर न शोधता प्रेक्षक फक्त हसत राहिले आणि शेवटी खुनाचा तपास विनोदातून उलगडला.
अभिनय कट्टा क्रमांक ४२२ वर एखाद्याचा खून पाहून त्यावरचा तपास अनुभवताना पोट धरून हसण्याचं कारण ठरली ऋषीकेश तुराई लिखित आणि किरण नाकती दिग्दर्शित धम्माल एकांकिका 'बायकोच्या नवरयाच्या बायकोचा खून'.राम आणि मंदाकिनी ह्या जोडप्याची हि धम्माल गोष्ट. दोघांमध्ये प्रेम होत त्यानंतर दोघंही विवाहबंधनात अडकतात. पण रामच्या बाहेरच्या भानगडींमुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होतो.म्हणूनच मंदाकिनी तिची मैत्रीण व तिचा नवरा ह्यांच्या साथीने रामला एका खोट्या खुनात अडकवते.या सर्व प्रसंगातून धडा शिकलेल्या रामला स्वतःची चूक कळते.आणि त्यानंतर त्याला कळत की हा सर्व त्याला धडा शिकवायचा कट होता आणि त्याने त्याच्या बायकोच्या नवऱ्याच्या बायकोचा खून केलाच नाही आणि तो निर्दोष आहे. आणि त्यांचा संसार पुन्हा सुरु होतो. परंतु ह्या सर्व कथानकात नाट्यमय रित्या उभा केलेला राम वरील खटल्याचा प्रसंग,रामची होणारी पोलीस चौकशी,त्यांच्या वैवाहिक जीवनातील गमतीदार प्रसंग शेवटचा खुनाचा अंगावर येणारा प्रसंग आणि त्यानंतरचा उलगडणार काटाच गुपित हे सर्वच प्रेक्षकांना पोटभर हसवताना एकांकिकेत गुंतवून ठेवणारा होत.दिग्दर्शक किरण नाकती ह्यांनी प्रत्येक पात्र एका वेगळ्या पद्धतीने रंगवलेले. आणि प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून गेलं.ह्या फिल्मी एकांकिकेत रामची भूमिका कदिर शेख आणि मंदाकिनीची भूमिका रोहिणी थोरात ह्यांनी केली.जिचा खून होतो मंदाकिनीच्या मैत्रिणीची भूमिका विद्या पवार तर तिच्या नवऱ्याची खतरनाक खलनायकाची भूमिका आदित्य नाकती ह्यांनी साकार केली.पॉट धरून हसवणारा न्यायाधीश वैभव चव्हाण ह्याने तर त्याला साथ देणाऱ्या धम्माल वकिलांची भूमिका रोहित आयरे आणि महेश झिरपे ह्यांनी साकारली. मंदाकिनीला छेडणाऱ्या गुंडांची भूमिका सहदेव कोळंबकर आणि शनी जाधव ह्यांनी तर मंदाकिनीचा भाऊ कुंदन भोसले ,मंदाकिनीची वाहिनी आरती ताथवडकर आणि मंदाकिनीच्या गुलाबी मित्राची भूमिका सहदेव साळकर ह्यांनी साकारली. लय भारी इन्स्पेक्टर उत्तम ठाकूर आणि सतरंगी धडाकेबाज हवालदार प्रशांत सकपाळ ह्याने उभी केली.लग्नातील वऱ्हाडामध्ये अभय पवार, ओमकार मराठे ,अजीत भोसले धम्माल उडवून दिली.सादर एकांकिकेचे संगीत संयोजन परेश दळवी आणि प्रकाशयोजना अथर्व नाकती ह्यांनी केले.सादर एकांकिकेचे रंगीबेरंगी नेपथ्य शनी जाधव,परेश दळवी ह्यांनी उभारले. आम्हा कट्टेकरींचा रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन हाच एकमेव ध्यास. आपला अमूल्य वेळ काढून आम्हाला कौतुकाची थाप देण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकाला मनमुराद आनंद देण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो.आजवर अनेक एकांकिका झाल्या काहीमधून प्रबोधन झाले काही मनोरंजन करून गेल्या. आजची एकांकिका हि अभिनय कट्ट्याच्या मनोरंजनाच्या खजिन्यात अजून एक धम्माल विनोदी रत्न म्हणून सामील झाली.आम्हा कलाकारांची प्रामाणिक मेहनत आणि तुमचे आशीर्वाद म्हणूनच हा प्रवास चालू आहे.आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच असुदे असे आवाहन अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी उपस्थित प्रेक्षकांना केले.
कट्टा क्रमांक ४२२ ची सुरुवात ज्येष्ठ प्रेक्षक प्रतिनिधी सुनीता दिघे ह्यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानांतर वैभव चव्हाण ह्याने 'ऑल लाईन क्लिअर' आणि धनेश चव्हाण ह्याने 'लालटेन' ह्या एकपात्रीचे सादरीकरण केले. सादर एकांकिकेचे निवेदन अभिनय कट्ट्याच्या कलाकार माधुरी कोळी ह्यांनी केले.