ठाण्यात जंगली मगरीची तस्करी करणाऱ्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 11:52 PM2021-07-12T23:52:34+5:302021-07-12T23:57:52+5:30
ठाण्यात कोकोडीयस पॅलेस्ट्रीयस अर्थात जंगली मगरीच्या पिल्लांची तस्करी करणाºया साकलेन सिराजउद्दीन खातीब (२८, रा. कौसा, मुंब्रा, ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने शनिवारी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाण्यात कोकोडीयस पॅलेस्ट्रीयस अर्थात जंगली मगरीच्या पिल्लांची तस्करी करणाºया साकलेन सिराजउद्दीन खातीब (२८, रा. कौसा, मुंब्रा, ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने शनिवारी अटक केली. त्याच्याकडून मगरीची सात पिल्ले जप्त केली आहेत.
मुंब्रा रेतीबंदर रस्त्यावर एक व्यक्ती जंगली मगरीची पिल्ले बेकायदेशीरपणे बाळगून तस्करीसाठी येणार असल्याची टीप ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार रोशन जाधव यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल, परिक्षेत्र वन अधिकारी यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक पोपट नाले, जमादार संजय भिवणकर, पोलीस हवालदार नितीन ओवळेकर आणि पोलीस नाईक हेमंत महाले आदींच्या पथकाने १० जुलै २०२१ रोजी कौसा भागात सापळा रचून साकलेन याला अटक केली. त्याच्या तावडीतून दोन लाख ८६ हजारांच्या सात जिवंत मगरीच्या पिल्लांचीही सुटका केली. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ चे कलम ९, ३९ तसेच ५१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साकलेन याला ठाणे न्यायालयाने १५ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.