आणखी एक ज्वेलर्स गाशा गुंडाळणार?; डोंबिवलीत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 12:32 AM2019-11-01T00:32:46+5:302019-11-01T00:32:59+5:30
ग्राहकांचा जीव टांगणीला
डोंबिवली : मागील वर्षी आणि यंदाही ऐन दिवाळीत शहरातील नामांकित सराफा व्यापाऱ्यांनी ग्राहकांना कोट्यवधींचा गंडा घातल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. गुडविन ज्वेलर्सच्या संचालकांनी फसवणूक केल्याच्या तक्रारींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच शहरातील आणखी एक सराफा व्यावसायिकही गाशा गुंडाळण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सराफा व्यापाऱ्यांमध्ये रंगली आहे.
पूर्वेला फडके रोड, टिळक रोड, मानपाडा रोड येथे प्रामुख्याने सराफ व्यावसायिकांच्या पेढ्या आहेत. त्यापैकी काही पेढ्या या ‘गुडविन’च्या संचालकांच्या नातेवाइकांच्या आहेत. त्यामुळे हे सराफा व्यापारीही गाशा गुंडाळणार की काय?, नेमके त्यांचे नातेवाईक कोण?, त्यांची पेढी नेमकी कुठे आहे, अशी चर्चा सध्या बाजारात सुरू आहे. शहरातील काही सराफा व्यापारी आपल्या जवळच्या ग्राहकांना खाजगीत ‘त्या’ सराफा व्यापाºयाकडे गुंतवणूक केली असेल तर तातडीने पैसे काढून घ्या, सतर्क व्हा, असा सूचक इशाराही देत आहेत.
‘गुडविन’च्या घटनेमुळे अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे त्याचा फटका ऐन दिवाळीत अन्य सराफा व्यावसायिकांना बसत आहे. सणाच्या दिवसांमध्येच ग्राहकांनी पाठ फिरवल्याने व्यवसायावर सपशेल पाणी फिरवले गेल्याने सराफा व्यापारी प्रचंड नाराज आहेत. त्यातच आणखी एका व्यापाºयाने जर दुकान बंद केले तर मात्र ग्राहकांनी भरवसा तरी कोणावर ठेवायचा, असा पेच डोंबिवलीच्या बाजारपेठेत निर्माण झाला आहे. त्यामुळे सराफा व्यापाºयांकडे गुंतवणूक करायची की नाही?, तसेच गुंतवणूक आणि भिशी असल्यास त्याचे काय होणार?, असे सवाल महिला वर्गाला पडले आहेत. दरम्यान, कोणीही पुढे येऊन बोलत नसले तरीही सराफांकडे गुंतवूणक नको रे बाप्पा, अशीच कुजबूज सर्वत्र शहरात सुरू आहे.