अंतर्गत मेट्रोसाठी खासगी संस्थांचे कर्ज घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:48 AM2021-09-10T04:48:28+5:302021-09-10T04:48:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : अंतर्गत मेट्रो प्रकल्प उभारणीच्या खर्चासाठी केंद्र आणि राज्य शासनाचा प्रत्येकी १६.६५ टक्के आर्थिक सहभाग ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : अंतर्गत मेट्रो प्रकल्प उभारणीच्या खर्चासाठी केंद्र आणि राज्य शासनाचा प्रत्येकी १६.६५ टक्के आर्थिक सहभाग असणार आहे. परंतु राज्य शासनाचे समभाग (ठाणे महापालिकेचे साहाय्य) असा उल्लेख प्रस्तावाबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केली. त्यावर स्पष्टीकरण देताना राज्य आणि केंद्र शासनाकडून अर्थसाहाय्य मिळणार असले तरी ते कर्ज स्वरूपात फेडावे लागणार आहे. उर्वरित खर्च बहुपक्षीय किंवा द्विपक्षीय संस्थांकडून अल्पव्याजदराने कर्ज घेऊन आणि महापालिकेच्या अर्थसाहाय्यातून केला जाणार आहे, अशी माहिती पालिकेचे प्रकल्प अधिकारी प्रवीण पापळकर यांनी सभेत दिली.
कळवा-मुंब्रासह दिव्यातही अंतर्गत मेट्रो
ठाणे शहराच्या धर्तीवर कळवा-मुंब्रा आणि दिवा भागात अंतर्गत मेट्रो प्रकल्प राबविण्याची मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी काही वर्षांपूर्वी केली होती. त्यावर काय प्रयत्न केले याची माहिती मुल्ला यांनी मागितली. त्यावर कळवा-मुंब्रा आणि दिवा भागात अंतर्गत मेट्रो मार्गाची चाचपणी केली असून, दिवा भागात मार्ग निश्चित करताना काही अडचणी आल्या होत्या. कोरोनाकाळातमुळे त्या दूर करणे शक्य झाले नव्हते. परंतु, आता त्या दूर करण्याचे काम सुरू आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले. त्यानंतर याबाबत मंत्री, खासदार आणि लोकप्रतिनिधींची लवकरच बैठक घेऊन निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली.
उत्पन्नातून कर्जाचा होणार भार हलका
एकदा अंतर्गत मेट्रो प्रकल्प ठाणे शहरात कार्यान्वित झाल्यानंतर यापासून मिळणाऱ्या उत्पन्नातून कर्जाचा भार हलका केला जाऊ शकतो, असा दावा ठाणे महापालिकेने केला आहे. मात्र ठाण्यातील किती टक्के नागरिक तिचा वापर करतील, यावर या सर्व गोष्टी अवलंबून आहेत.
---------------