Sameer Wankhede : "पोलिसांना सहकार्य करणार"; समीर वानखेडे यांची पोलिसांकडून आठ तास चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 06:25 AM2022-02-24T06:25:48+5:302022-02-24T06:26:39+5:30
Sameer Wankhede : वयाची जाणीवपूर्वक चुकीची माहिती देऊन नवी मुंबईतील बारसाठी परवाना मिळविल्याचा वानखेडे यांच्यावर आरोप आहे.
(बातमी फोटो - विशाल हळदे)
Sameer Wankhede : नवी मुंबईतील हॉटेलमध्ये मद्य विक्रीच्या परवान्यासाठी बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी एनसीबी मुंबईचे माजी संचालक समीर वानखेडे यांची कोपरी पोलिसांनी बुधवारी सलग आठ तास चौकशी केली. वानखेडे यांच्यावर याबाबत आरोप करणारे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची मुंबईतील ईडी कार्यालयात अशीच आठ तास चौकशी सुरू असताना वानखेडे हेही ठाण्यात पोलिसांच्या प्रश्नांच्या सरबत्तीला सामोरे जात होते. आपण तपासात पोलिसांना संपूर्ण सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया वानखेडे यांनी सायंकाळी कोपरी पोलीस ठाण्यातून बाहेर पडताना दिली. याखेरीज अधिक बोलण्यास स्पष्ट नकार दिला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नवी मुंबई विभागाने वानखेडे यांच्याविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात १९ फेब्रुवारी रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. याच संदर्भात त्यांना बुधवारी हजर राहण्याची नोटीस कोपरी पोलिसांनी बजावली होती. त्या पार्श्वभूमीवर आपल्या वकिलांसह बुधवारी सकाळी वानखेडे कोपरी पोलिसांसमोर हजर झाले. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे हे कामानिमित्त बाहेर असल्यामुळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसुझा यांनी त्यांना साडेअकरा वाजता पोलीस ठाण्यात पाचारण केले. सायंकाळी साडेसातपर्यंत सुरू होती.
चौकशीनंतर बाहेर पडल्यावर पोलिसांना तपासात संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे वानखेडे यांनी सांगितले. वयाची जाणीवपूर्वक चुकीची माहिती देऊन नवी मुंबईतील बारसाठी परवाना मिळविल्याचा वानखेडे यांच्यावर आरोप आहे. वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी नवी मुंबईत सद्गुरू बारकरिता मद्यविक्रीचा परवाना मिळविला होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर योग्य उत्तरे न मिळाल्याने ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी त्यांच्या बारचा परवानाही रद्द केला. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाने कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्याच्याच चौकशीकरिता त्यांना बुधवारी बोलावले होते.
वानखेडे यांच्याबाबतचे प्रकरण संवेदनशील असल्याने तसेच तपास सुरू असल्यामुळे तपासातील आणि चौकशीतील भाग उघड करता येणार नाही. गरज भासल्यास वानखेडे यांना पुन्हा चौकशीला बोलावण्यात येईल. -
ममता डिसुझा,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोपरी पोलीस स्टेशन, ठाणे
आता गुन्हा कसा दाखल केला?
वानखेडे यांच्याविरुद्ध दाखल झालेला गुन्हा हा १९९७ साली ते अल्पवयीन असताना घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अल्पवयीन असताना घडलेल्या एखाद्या गुन्ह्याबद्दल आता एफआयआर कसा नोंदविला जाऊ शकतो, असा सवाल वानखेडे यांचे वकील फैजल शेख यांनी ‘लोकमत’कडे केला.